”राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई हा राजकीय मुद्दा आहे. राहुल गांधी सातत्याने देशातील विविध मुद्द्यांवर आवाज उचलत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या कारवाईने होत आहे”, अशी टीका काँग्रेसने नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या एका निर्णयाचे अनेक राजकीय अर्थ निघत आहेत. आता याच मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेत केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याच पत्रकार परिषदेत अभिषेक मनु सिंघवी असं म्हणाले आहेत.
‘राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न’
काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ”राहुल गांधी बेधडक बोलत आहेत. ते सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर सातत्याने बोलत आहेत.मग तो नोटाबंदीचा मुद्दा असो, चीनचा असो किंवा जीएसटी असो, त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार हे सर्व करत आहे.”