राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या मुद्यावरून तीव्र गदारोळ झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे कृत्य करणाऱ्या सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
LIVE अपडेट्स…
- राहुल गांधींच्या विधानावरून सभागृहात सत्ताधारी व विरोधकांनी तीव्र गदारोळ केल्यामुळे विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब
- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांना पंतप्रधान मोदींविरोधातील नारेबाजी सहन न करण्याचा इशारा.
- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या आमदारांच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार नारेबाजी.
- विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शन केली. गुजरात निरमा पावडर, केंद्रीय यंत्रणा तसेच राज्य सरकारच्या कारभाराविरोधात गुजरातचा निरमा क्लीन चिट मिळवा अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.
विधामंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस उरले आहेत. आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे. यात विरोधकांकडून गंभीर आरोप केले जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे. काल हा प्रस्ताव सादर होऊ न शकल्याने आज सादर केला जाणार आहे. या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती चर्चा करणे अपेक्षित असणार आहे.
विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता
आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केल्यानंतर राज्यातील कायदा, सुव्यवस्था यावर विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी झालेल्या हिंसेच्या घटना, बलात्काराच्या घटना, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.