गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील 4 लाख 10 हजार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’
- औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते वितरणास प्रारंभ
- अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना, केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभ
लातूर (जिमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 4 लाख 10 हजार 548 कुटुंबांना याचा लाभ मिळणार असून औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत आज ‘आनंदाचा शिधा’ वितरणास प्रारंभ झाला.
औसा शहरातील आर. व्ही. लद्दे यांचे रास्त भाव दुकानामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार भरत सुर्यवंशी तसेच पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे, रास्त भाव दुकानदार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रेवणसिध्द भागुडे, भिमाशंकर राचट्टे, सुनिल उटगे, समीर डेंग, शिवरूद्र मुरगे, गोरख हंचाटे तसेच शहरातील रास्त भाव दुकानदार व लाभार्थी, नागरिक उपस्थित होते.
शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना केली होती. त्यानुसार लातूर जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरणास आजपासून प्रारंभ झाला.
लातूर तालुक्यातील 1 लाख 496, औसा तालुक्यातील 53 हजार 190, रेणापूर तालुक्यातील 29 हजार 621, निलंगा तालुक्यातील 55 हजार 513, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 17 हजार 383, अहमदपूर तालुक्यातील 40 हजार 314, चाकूर तालुक्यातील 31 हजार 348, देवणी तालुक्यातील 19 हजार 544, उदगीर तालुक्यातील 46 हजार 736 आणि जळकोट तालुक्यातील 16 हजार 403 शिधापत्रिकाधारकांना या योजनेतून शिधा जिन्नस वितरण होणार आहे.
सर्वसामान्य जनतेला मोठ्या मॉलमध्ये ज्या दर्जाचे शिधाजिन्नस विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्याच दर्जाचे शिधा जिन्नस ‘आनंदाचा शिधा’मधून वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रास्त भाव दुकानामध्ये गुढीपाडवा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत या शिधा जिन्नसांचे शासनामार्फत करण्यात येणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
गुढीपाडव्यापासून ‘आनंदाचा शिधा’ वितरणाला जिल्ह्यात सुरुवात होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना या जिन्नसाचे वितरण केले जाईल. एकही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक तहसीलदार भरत सुर्यवंशी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांनी केले. रेवणसिद्ध भागुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.