महिला सन्मान योजनेचा पाच दिवसात लातूर जिल्ह्यातील 1 लक्ष 71 हजार महिलांनी घेतला लाभ
- राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसच्या तिकिटात 50 टक्के सवलत
- 17 मार्चपासून योजनेची अंमलबजावणी सुरु; सर्व प्रकारच्या बसमध्ये मिळणार सवलत
लातूर, (जिमाका) : राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेनुसार महिला सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. राज्यात 17 मार्चपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पाचच दिवसात म्हणजेच 21 मार्चपर्यंत जिल्ह्यातील 1 लक्ष 71 हजार 694 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला.
महिला सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साधी बस, मिनी बस, निमआराम बस, विनावातानुकूलित शयन-आसनी बस, शिवशाही, शिवनेरी, शिवाई आणि इतर सर्व बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत ही सवलत लागू राहणार आहे. 75 वर्षांवरील नागरिकांसाठी यापूर्वीच ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेंतर्गत प्रवास भाड्यात शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुला-मुलींनाही 50 टक्के सवलत लागू आहे. आता उर्वरित सर्व वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे.
महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी 17 मार्चपासून सुरु झाली असून 17 मार्च ते 21 मार्च या कालावधीत जिल्ह्यात 1 लक्ष 71 हजार 694 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये लातूर आगार अंतर्गत 38 हजार 510, उदगीर आगार अंतर्गत 40 हजार 353, अहमदपूर आगार अंतर्गत 29 हजार 290. निलंगा आगार अंतर्गत 37 हजार 851 आणि औसा आगार अंतर्गत 25 हजार 690 महिलांना लाभ देण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे लातूर विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी दिली.