गरिबीचा चिरंतन कोरोना म्हणजे नाकारलेल्या माणसाची जगण्याची चित्तरकथा-उत्तम कांबळे
निलंगा:- विलास माने लिखित गरिबीचा चिरंतन कोरोना हे पुस्तक म्हणजे कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या व महामारी च्या काळात समाजाने नाकारलेल्या माणसाची जीवन जगण्याची चित्तरकथा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.
भटक्या विमुक्तांसाठी चळवळ करणारे विलास माने लिखित ” गरिबीचा चिरंतन कोरोना ” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे,माजी आमदार कॉम्रेड माणिक जाधव,अशोक पाटिल निलंगेकर,प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे,लिंबन महाराज रेशमे,पंडित धुमाळ,डॉ लालासाहेब देशमुख,
विलास माने, सौ.कलावती माने,विलास सुर्यवंशी,रजनीकांत कांबळे,अंकुश ढेरे, रोहित बनसोडे, दयानंद चोपणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना उत्तम कांबळे म्हणाले,सटवाई प्रत्येक माणसाचे भविष्य लिहिते असे म्हणतात.पण एका भटक्या समाजातील माणसाने सटवाईने लिहिलेले भविष्य खोटे ठरवत विलास माने यांनी तिसरे पुस्तक लिहून साहित्यिकाच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे हे संघर्ष करणाऱ्यांसाठी महत्वाचे आहे.
निसर्ग नुसतेच जीवाणू जन्माला घालत नाही तर,विषाणूही जन्माला घालतो.सतत अनेक रोग तयार होत असतात.तसाच कोरोना आला व त्याने शहाण्या,सुशिक्षित लोकांनाही संभ्रमात टाकले.काय करावे हे कोणालाही कळत नव्हते.श्रीमंत पैशाच्या सहाय्याने लढा देत होते.त्याचवेळी भटक्यांचा स्वतःच्या ताकदीवर जीवनसंघर्ष चालू होता.त्या दोन तीन वर्षातील कोरोना विरुध्द चाललेला भटक्यांचा,गरीबांचा संघर्ष हा विलास माने यांनी स्वतः पाहिलेला व अनुभवलेला आहे. त्यांनी भोगलेले अनुभव या पुस्तकातून मांडलेले असून इतरांना व सरकारलाही जिवंत रहाण्यासाठीचा एक वास्तूपाठ म्हणजे हे पुस्तक आहे.
माणुस किती सामर्थ्यशाली असला तरी तो मृत्यूला सर्वात जास्त घाबरतो. कोरोणामुळे माणसातील नाते संपुष्टात आले. मानवनिर्मित संकटे हे माणसाच्या प्रगतीच्या जीवनातील मुख्य अडथळे आहेत. आज जल, जंगल व जमीन हे भांडवलशाही च्या ताब्यात गेल्याने सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे. एन.जी.ओ.नी “पेड वर्कर्स” ही संकल्पना आणल्याने देशात समर्पित भावनेने सामाजिक व विधायक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची उणीव भासत आहे. विलास माने म्हणजे एक लढाई असून “गरिबीचा चिरंतन कोरोना” या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी एक प्रेक्षक या नात्याने त्यांच्या कार्याला सलाम करण्यास व त्यांच्या कर्तुत्वाला बळ देण्यासाठी आलो असल्याचे उत्तम कांबळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सुषमा अंधारे,माजी आमदार माणिक जाधव,अशोक पाटिल,प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, विलास सिंदगीकर, विलास सुर्यवंशी,रजनीकांत कांबळे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विलास माने यांनी पहिले पुस्तक ” कत्ती” दुसरे “वेदनेच्या पाऊलखुणा ” व आज प्रकाशीत झालेले ” गरिबीचा चिरंतन कोरोना ” अशी लिखाणाची वाटचाल कशी झाली याचा व कोरोनाच्या अनुभवाचा वृत्तांत व संघर्ष यावेळी कथन केले.
प्रास्ताविक श्रीमती सुनीला पंडित यांनी केले.सुत्रसंचलन सतीश हाणेगावे यांनी
तर आभार प्रदर्शन श्रीशैल बिराजदार यांनी मानले
पुस्तक प्रकाशन सोहळ्यास डॉक्टर,प्राध्यापक,शिक्षक , भटके विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते व विलास माने यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.