मुंबई: निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय शनिवारी रात्री जाहीर केला. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नव्यानं उभारी घेऊ पाहत असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मुंबईतील अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे आणि शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचं नाव किंवा निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेनेचं चिन्ह गोठवले जाणार, हा निर्णय अनेकांना अपेक्षित होता. त्यामुळे फक्त शिवसेनेलाच मोठा धक्का बसेल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, निवडणूक आयोगाने आणखी एक पाचर मारून ठेवल्यानं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी इमान सांगणाऱ्या शिंदे गटाचीही गोची झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एक पोस्ट केली आहे. जिंकून दाखवणारच, अशा दोन शब्दांची ही पोस्ट आहे. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो या पोस्टमध्ये आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी निवडणूक चिन्हाबद्दल एक सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आमचं चिन्ह श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं आहे. यासोबत त्यांनी वाघाचा एक फोटो ट्विट केला आहे. शिवसेनेच्या पोस्टरवर डरकाळी फोडणारा वाघ पाहायला मिळतो. मात्र नार्वेकरांनी ट्विट केलेल्या फोटोत दिसणारा वाघ वेगळा आहे.
शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हरिवंशराय बच्चन यांची प्रसिद्ध कविता पोस्ट केली आहे. आदित्य यांच्याकडून अग्निपथ कविता पोस्ट करण्यात आली आहे. उद्धव आणि आदित्य यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट पाहता पिता-पुत्र जोरदार संघर्ष करण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत आहे.