मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातून आज रविवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ‘महाप्रबोधन यात्रा’ या जनसंपर्क कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याचे शिवसेना नेते चिंतामणी कारखानीस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
या महाप्रबोधन यात्रेत लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेत कार्यकर्त्यांच्या भावनांना चालना देण्यासाठी राज्यभरात रॅली काढणार असल्याचे कारखानीस म्हणाले. ‘आपला महाराष्ट्र, महान महाराष्ट्र’ अशा घोषणा असलेल्या या यात्रेच्या पोस्टर्सवर पक्षाचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे या दोघांच्याही प्रतिमा असतील. पक्षातील विश्वासघात आणि बंडाचा पाळणा हललेल्या ठाणे येथूनच या यात्रेला सुरुवात होत आहे. येथून एल्गार केला जाणार आहे. आम्हाला सामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे, असे खासदार राजन विचारे यांनी पत्रकारांना सांगितले.