• Thu. Aug 14th, 2025

बावनकुळेंच्या फॉर्म्युलामुळे युतीत ठिणगी, शिंदे गटाच्या आमदारकडून वेगळा विचार करण्याचा इशारा

Byjantaadmin

Mar 20, 2023

रत्नागिरी: आजची सभा झाली आता अधिवेशन संपल्यावर मग कळेल काय होतेय आणि काय नाही ते कोण कोण आमदार येतात ते तुम्हाला लवकरच कळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जेष्ठ नेते आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला दाखल झाल्यानंतर भरत गोगावले यांनी पत्रकारांजवळ संवाद साधला.चंद्रशेखर बावनकुळे यांनी चुकून ते विधान केले आहे. पण जर ते या विषयावर ठाम असतील तर मग आम्ही विचार करू, असा सूचक ईशारा गोगावले यांनी दिला आहे.

आमचं ऑपरेशन चालू आहे, वेळ आली की जाहीर करू. लवकरच त्याचा गौप्यस्फोट केला जाईल, असे भरत गोगावले यांनी सांगितले. संजय राऊत यांना जर का आम्ही मतं दिली नसती तर राऊत यांची आज काय अवस्था असती? आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरा मान वाकडी केली असती तर आज आज संजय राऊत ना घर का घाट का अशी परिस्थिती झाली असती. त्यामुळे त्यांनी संजय राऊत यांनी तोंड सांभाळून बोलावं, असा थेट इशाराच भरत गोगावले यांनी दिला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना भाजपा युतीच्या जागा वाटपाबाबत केलेल्या विधानसंदर्भात बोलताना भरत गोगावले यांनी सांगितले की, त्यांचा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता त्यांनी नंतर सारवासारव केली हे तुम्ही पाहिलं त्यांनी दुरुस्ती केली आहे हे आम्ही समजून घेऊ. पण ते जर का ते त्याच विषयावरती ठाम असतील तर आम्हीही विचार करू, असा इशाराही भरत गोगावले यांनी दिला.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला सांगितला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे १५० ते १७० आमदार निवडून येतील. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे ५० पेक्षा जास्त आमदारच नाहीत. त्यामुळे विधानसभेला भाजप शिंदे गटासाठी २८८ पैकी फक्त ४८ जागा सोडेल, हे स्पष्ट झाले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंना जागावाटपाचे अधिकार कोणी दिले; संजय शिरसाटांचा संतप्त सवाल

जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. अशा वक्तव्यांमुळे युतीत बेबनाव निर्माण होऊ शकतो, याची जाण बावनकुळे यांना असायला हवी. विधानसभा निवडणुकीला फक्त ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का, असा सवाल संजय शिरसाट यांनी विचारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *