• Thu. Aug 14th, 2025

श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय बुकी जयसिंघानीच्या जागेवर, सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

Byjantaadmin

Mar 20, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय हे बुकी अनिल जयसिंघानी याच्या जागेवरच असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे आणि अनिल जयसिंघानी यांचे संबंध काय? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

सुषमा अंधारे यांची काल मुखेड येथे महाप्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उल्हास नगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कोणाच्या जागेत आहे? याचा शोध घ्या, असेही अंधारे यांनी म्हटले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, उल्हासनगरमध्ये गोल मैदाममध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचे कार्यालय कोणाच्या जागेत आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी एकदा तपासून पाहावे. ती जागा अनिल जयसिंघानीच्या नावावर आहे का, हे एकदा पाहावे. ज्या अनिल जयसिंघानियाच्या नावाने अनेक आरोप केले जातात, त्यांच्या जागेत श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कसे? ती जागा कोणाची? कोणाच्या नावावर? खरेदी विक्रीची कागदपत्रे तपासा, असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.

सुषमा अंधारे म्हणाल्या, काल संध्याकाळी व्हायरल झालेल्या फोटोत दिसत आहे की, अनिक्षा जयसिंघानीचे वडिल टॉप बुकी अनिल जयसिंघानी यांचा. 2015 मध्ये त्यांचे शिवसेनेत प्रवेश करण्याचे ठरले होते. हा माणूस मातोश्रीपर्यंत कसा येतो, याबाबत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अमृता फडणवीस यांच्या प्रकरणात त्यांनी हे आरोप केले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर 2021 साली पहिल्यांदा भेट झाली होती. अनिक्षाने सांगितले की, ती कपडे दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे अशी विनंती केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली, असेही अमृता म्हणाल्या.

पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, 27 जानेवारी 2023 रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अनिक्षा तिथे भेटली. कार्यक्रम झाल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवले. तेव्हा बोलताना अनिक्षाने म्हटलं की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत होते. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. यानंतर अनिक्षाला कारमधून खाली उतरवले, असे तक्रारीतही म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *