• Wed. Apr 30th, 2025

काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर

Byjantaadmin

Oct 9, 2022

बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत

जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार

 अपघातातील प्रत्येक जखमीची केली आस्थेवाईकपणे विचारपूस

सर्वांना वेळेत, संपूर्ण उपचार दिला जाणार

दुर्घटनास्थळाची केली पाहणी

 

नाशिक (जिमाका वृत्तसेवा) – काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत विश्वास दिला.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवासी बस जळून 12 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला तर काही प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आज शासकीय रूग्णालयात दाखल होत प्रत्येक जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली, त्याप्रसंगी धीर देताना ते बोलत होते.

यावेळी बंदरे व खनिकर्म तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण  व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार हेमंत गोडसे,  आमदार देवयानी फरांदे, सुहास कांदे, मुफ्ती मोहम्मद, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार रचना पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, डॉ.आवेश पलोड, आणि इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आज पहाटे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. अशा परिस्थितीत  अपघातग्रस्त प्रवासी व त्यांचे नातेवाईकांच्या सोबत शासन आहे. जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या अपघातात मृत पावलेला प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्याआधी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटना स्थळास भेट दिली.

ही टीम देतेय उपचार…

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ.गोपाळ शिंदे यांच्यासह चार अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक. शल्य चिकित्सक डॉ.भामरे यांच्या नियंत्रणाखाली 3 शल्य चिकित्सक डॉक्टरांचे पथक, भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पवार त्यांच्या नियंत्रणाखाली 2 भूलतज्ज्ञ, 2 न्यायवैदिक तज्ज्ञ, 4 अपघात वैद्यकीय अधिकारी असे एकूण 19 वैद्यकीय पथकासह आपत्कालीन कक्षाच्या सर्व अधिकारी, कक्षाच्या मेट्रन व वर्ग चार चे सर्व कर्मचारी सेवा देत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून एका गंभीर  अवस्थेत असलेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात 108 रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले आहे.

या बस अपघातात 12 मृत्यू, चार घरी सुखरुप पोहचले असून व्हिजन हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण उपचार घेत आहेत. पंचवटीतील सिल्वर हॉस्पिटलमध्ये पाच रुग्ण, सुविधा हॉस्पिटलमध्ये एक, जिल्हा रुग्णालयात एकूण 31 जखमी प्रवासी उपचार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *