खरोसा लेणी परिसरात शिखर असलेली वैशिष्ट्यपूर्ण एकाश्मक मंदिरे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील डॉ. महाके, जोशी, खामकर आणि कांबळे यांचे नवीन संशोधन
लातूर प्रतिनिधी
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील इतिहास संशोधक व मंदिर स्थापत्य अभ्यासक प्रा.डॉ माधवी महाके व त्यांचे संशोधक विद्यार्थी हे मागील दोन वर्षापासून लातूर जिल्ह्यातील एकाश्मक मंदिराचा शोध घेत आहेत, डॉ. माधवी महाके यांनी या आधी लोहारा येथील एकाश्मक मंदिरावर संशोधन केले आहे. डॉ महाके त्यांचे संशोधक विद्यार्थी श्री.प्रसाद जोशी, समृद्धी कांबळे, श्री सतीश खामकर यांना खरोसा लेणी असलेल्या टेकडीवर वैशिष्ट्यपुर्ण मंदिर आढळून आली आहेत.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील, खरोसा लेणी प्रसिद्ध आहेत, त्या प्राचीन काळी चालुक्य पर्वत म्हणून ओळखल्या गेलेल्या टेकडीवर जांभ्या प्रस्तरात खोदलेल्या लेणी आहेत. लेणी निर्मितीसाठी अनुकूल पाषाण नसतानाही खरोसा लेणीची स्थापत्य रचना कलापूर्ण आहे. या लेणीचा जेम्स बर्जेस पासून अनेकानी अभ्यास केला आहे. याठिकाणी दुमजली लेणीच्या खालच्या मजल्यावर लघु दालने सभामंडपाच्या दोन्ही बाजूने खोदली आहेत या दालनाचा एकाश्मक मंदिर असा उल्लेख काही अभ्यासकानी केला आहे, लेणीचा एक भाग असललेल्या या मंदिरांचे स्वतंत्र अस्तित्व दिसत नाही, एकाश्मक मंदिर स्थापत्याबाबत निश्चित निरिक्षणे, उहापोह ही कोठे आढळून येत नाही.
त्यानंतर काही संशोधकांनी या टेकडी वरील स्वतंत्र एकाश्मक मंदिराचा उल्लेख केला आहे, परंतू निश्चित स्थान, त्यांची स्थापत्य रचना, वैशिष्ट्ये, निर्मिती उद्देश, कालखंड, नेमकी संख्या,याबाबत साशंकता दिसते. ही मंदिरे ध्यानमंदिरे आहेत की समाधी मंदिरे ? लेणी निर्मिती वेळीच निर्माण केली की त्यानंतरच्या काळात ? जर ती उपासनेच्या अनुषंघाने निर्माण झाली असतील तर कोणत्या धर्म पंथाशी सबंधित आहेत? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. शैव आणि वैष्णव असा ओझरता उल्लेख पूर्वसुरीचे अभ्यासक करतात मात्र शैव वैष्णवाशी सबंधित कोणतीही लक्षणे या मंदिरात आढळत नाहीत.
त्यामुळेच अलिकडील प्रस्तुत नवीन संशोधनानुसात या टेकड़ी वरील एक गर्भगृह असलेल्या, शिखर हे मंदिराचे व्यवच्छेदक लक्षण आढळून येणाऱ्या, स्वतंत्र अस्तित्व असलेल्या 10 एकाश्मक मंदिरांचा शोध घेतला गेला आहे आणखीन दोन ते तीन मंदिराची संख्या वाढूही शकते कारण पावसाळा, हिवाळा या ऋतूत गवत,काटेरी झुडुप निसरडा चढाव उताराचा दुर्गम डोंगराळ भाग यामुळे संशोधनास अनेक मर्यादा येत असल्याचे डॉ. महाके यांनी मत व्यक्त केले आहे.
तेथील मंदिराची 3 फुट पासून 6 फुट पर्यंत उंची असून सर्व मंदिराचे आकार चौकोनी आहेत . केवळ एका पाषाणात खोदलेले गर्भगृह आणि त्या गर्भगृहास जंघा भागापेक्षा (मंदिराच्या खालील भिंतीपेक्षा) थोड़ी जास्त उंची असलेले वर निमुळते होत जाणारे कलशासह शिखर अशी सर्व मंदिरांची रचना आहे. सध्या कोणतीही मंदिरात पूजनीय देवता नाही, प्रथमदर्शनी विचार केला तर बहुधा ती ध्यान मंदिरे असू शकतात किंवा समाधी मंदिरे ही असू शकतात त्यांचा उद्देश प्रायोगिक मंदिर निर्मितीचा प्रयत्न म्हणून ही केला गेला असेल का हा प्रश्न उपस्थित होतो परंतू एकंदरित शिखर रचना पहाता या मताला पुष्टी मिळत नाही. काही मंदिरे ही 3 फुट पेक्षा कमी उंचीचे आणि आत एक मनुष्य ही बसू शकणार नाही इतकी लघु रचना असलेली आहेत, देवतेचा निवास म्हणून जरी ती निर्माण केली असती तरी एवढी लहान रचना नक्कीच या मंदिराची केली गेली नसती, या मंदिरां पैकी 2 मंदिरे भग्न आहेत , 2मंदिरे मातीच्या ढिगाऱ्याआड अर्धवट बुजली आहेत.
येथील शिखराची निर्मिती अत्यंत काळजीपुर्वक केलेली दिसते, मोजमापे, शिखरावर शालाचे अंकन, शिखराच्या वर कलशाची निर्मिती यामुळे या मंदिरांस विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अश्या प्रकारची एकाश्मक मंदिरे लातूर जिल्ह्यात आणखीन आहेत का याचा शोध ही डॉ. महाके आणि त्यांचे विद्यार्थी श्री जोशी, कु. कांबळे, श्री खामकर घेत आहेत. लोहारा येथील एकाश्मक मंदिरांपेक्षा खरोसा येथील मंदिरे विशेष आहेत असे मत कोल्हापूर येथील एकाश्मक मंदिराचे अभ्यासक डॉ योगेश प्रभुदेसाई यांनी मांडले आहे, खरोसा येथील एकाश्मक मंदिराचे स्थापत्यशास्त्रीय विश्लेषण, मंदिर शैली निश्चिती, व कालखंड निश्चिती याबाबत सखोल संशोधन डॉ माधवी महाके आणि डॉ योगेश प्रभुदेसाई करणार असल्याची माहीती डॉ. महाके यांनी दिली आहे.
ही मंदिरे विशेष असल्या कारणाने त्याच्या जतनाची अत्यंत आवश्यकता आहे. पण तत्पूर्वी लवकरच त्यांवर यथायोग्य संशोधन प्रसिद्ध होईल असे डॉ. महाके आणि डॉ. प्रभुदेसाई यांचं प्रतिपादन केले आहे.
लातूर जिल्ह्यातील ही एकाश्मक मंदिरे प्रसिद्ध लेणी परिसरात असून ही केवळ लेणी प्रधान मानूनअभ्यास झाल्याने या मंदिराच्या स्थापत्यशास्त्रीय अस्तित्वाची दखल घेतली गेलेली दिसत नाही. या मंदिरांच्या पुर्ण संशोधनानंतर लातूर जिल्ह्यातील प्राचीन स्थापत्यांच्या इतिहासात आणखीन एका वेगळी लक्षणे असलेल्या नवीन वास्तूची भर पडणार आहे. या मंदिर शोध मोहिमेत श्री राज बैकरे आणि श्रीमाला गुडदे यांचे महत्वाचे योगदान लाभले असल्याचेही संशोधकानी सांगीतले आहे.