वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांचा आज मुंबईमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वारकरी संप्रदाय आणि काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. मीरा भाईंदर परिसरात हा कार्यक्रम पार पडत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची मागणी केली आहे.
बागेश्वर बाबा आज पहाटेच मुंबईत दाखल झाले. मीरा रोड येथे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस त्यांचा कार्यक्रम होणार आहे. भाईंदर पश्चिम येथील श्री माहेश्वरी भवनात पोहोचले आहेत. येथेच त्यांचा मुक्काम असणार आहे. बागेश्वर बाबांना पाहण्यासाठी मुंबई विमानतळावर भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
देशात चर्चेचा विषय
बागेश्वर बाबा ही देशभरात सध्या प्रचंड चर्चेत असलेली व्यक्ती आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनातील ओळखणे, अनोळखी माणसाची माहिती क्षणात सांगणे, अशा प्रकारचे चमत्कार करून दाखवण्याचे दावे बागेश्वर बाबा त्यांच्या दरबारात करत असतात. देशभरातील त्यांच्या भक्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला विरोध केलेला आहे.
अनिसचा विरोध
धीरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथे 2 दिवस होणाऱ्या दिव्य दर्शनाच्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. अंनिसचे अध्यश्र श्याम मानव म्हणाले की, आम्ही दिलेल्या तक्रारीत जादूटोणाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण नागपुरात झालेल्या त्यांच्या दिव्य दरबारात या कायद्याचे वारंवार उल्लंघन झाले आहे. डॉक्टरची पदवी नसलेल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर उपचार करण्याचा दावा केला तरी ते कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच संत तुकाराम महाराजांच्या वक्तव्यामुळे देखील बागेश्वर बाबांना वारकरी संप्रदायाकडून विरोध होत आहे.
वारकरी संप्रदाय, अंनिस, काँग्रेसच्या विरोधासमोर बागेश्वर बाबांचा कार्यक्रम यशस्वी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.