• Fri. May 9th, 2025

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

Byjantaadmin

Mar 18, 2023

मुंबई, :- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

विधानभवन येथे झालेल्या बैठकीस महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा अथर मिर्झा, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे सदस्य समीर गुलाम नबी काझी, शेख हसनैन शाकीर, मौलाना हाफिज सय्यद अथहर अली, डॉ. मुदस्सीर लांबे, अल्पसंख्याक विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी मो. बा. ताशीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जुनैद सय्यद उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. आवश्यक बाबींमध्ये विधी आणि न्याय विभागाकडून अभिप्राय, मार्गदर्शन आणि सूचना मागविण्यात येतील व त्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

अध्यक्ष वजाहत मिर्झा अथर मिर्झा म्हणाले की, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या विविध मागण्यांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्रस्तावही सादर करण्यात येतील.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळासाठी सहायक अनुदान, सहायक अनुदान खर्च करण्यासंदर्भात धोरण निश्चित करणे, वक्फ जमिनींच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भात धोरण निश्चित करणे, मुख्यालयासाठी जागा, वक्फ जमिनींच्या मालकी हक्कात बदल न करणे तसेच पदभरती या विषयांबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी एकरकमी सहायक अनुदानाची आवश्यकता असून हे अनुदान खर्च करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्याचीही आवश्यकता आहे. वक्फ जमिनींच्या भूसंपादनाबाबत महसूल विभागाकडून कार्यवाही होण्याची आवश्यकता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *