राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाचेची ऑफर दिल्याप्रकरणी फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर अनिक्षा प्रकरणात ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्यातच ट्विटर वॉर रंगल्याल्याचे पाहायला मिळाले. आता या वादात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही उडी घेतली आहे. अमृता फडणवीस यांनी चतुर्वेदी यांच्यावर आरोप करत थेट ‘औकात’ असा शब्द वापरला. याच शब्द पलटवार करत त्यांच्या अनेक मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
आमची एवढी औकात कुठे आहे की, आम्ही एकाच वेळी गायक, मॉडेल, राजकारणी बनू आणि त्याच वेळी ट्विटही करत राहू. मग सामाजिक कार्याच्या नावाखाली चॅरिटी शो देखील करु आणि तिकीट विकण्यासाठी संपूर्ण पोलीस खात्याचाही वापर करु. आमची एवढी औकात कुठे की, आमच्या एका अर्जावर पोलिसांनी ताबडतोब आमची तक्रार घ्यावी आणि एफआयआर दाखल करून आमच्या इच्छेनुसार आरोपपत्र दाखल करावे. वहिनी आणि नंनद या नात्याने इतकं लिहायला जागा आहे ना वहिनी? असा टोलाही सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी अनिक्षा प्रकरणात प्रश्न उपस्थित केल्यानंतर अमृता फडणवीसांनी ट्विट करत त्यांना उत्तर देण्याचं आव्हान केलं आहे. “मॅडम चतुर्वेदी, याआधीही तुम्ही मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. अॅक्सिस बँकेकडून मला काही चुकीचे फायदे मिळाल्याचे सांगितले होते. आताही तुम्ही माझ्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. तसं पाहिलं तर एखाद्याने जर तुमचा विश्वास जिंकला आणि केस बंद करण्यासाठी तुम्हाला लाच दिली, तर तुम्ही तुमच्या मास्टरच्या माध्यमातून त्या व्यक्तीला नक्कीच मदत कराल. हीच तर तुमची औकात आहे.” असे ट्विट करत अमृता फडणवीसांनी चतुर्वेदींची थेट औकातच काढली आहे.
यानंतर सुषमा अंधारे यांनी काही फोटो एकापाठोपाठ ट्विट करत अमृता फडणवीसांवर ताशेरे ओढले आहेत. #अमृतावहिनी अगदी बरोबर बोलतायत, खर तर खाली दिलेले फोटो बघून असं वाटतंय की आमची एवढी औकात कुठे की, आम्ही संपूर्ण पोलीस खाते आमच्या सेवेत तैनात करु, आमची एवढी औकात कुठे की, मुख्यमंत्री पदाचे सर्व प्रोटोकॉल तोडून आम्हीही त्यांच्या ताफ्यात सामील होऊ.