• Thu. May 8th, 2025

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन:विधानसभा प्रश्नोत्तरे

Byjantaadmin

Mar 16, 2023

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच

पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. १६ : पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी १२०० मीटर रस्त्याचे, तर डिसेंबरपर्यंत ४.५ किमी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

सदस्य संजय जगताप, छगन भुजबळ, चंद्रकांत भिंगारे आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातला नॅशनल हायवे ९६२ ते पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्त्याच्या कामाबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, येथील स्थानिक रहिवाशांनी या रस्त्याच्या कामाला हरकत घेतल्याने या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. सध्या या रस्त्यावरील वर्दळ वाढली असून वाहनांची या रस्त्यावरुन ये जा करण्याची संख्याही वाढली आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पण तात्पुरते काम न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यात १२०० मीटर रस्त्याचे काम तर डिसेंबरपर्यंत ४.५ किमी रस्त्याच्या पॅचचे काम, पूर्ण करण्यात येईल. यासाठी आवश्यक असणाऱ्या २५ कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात येईल. १२०० मीटर लांबीमध्ये ७ मीटर रुंदीचे काँक्रिटीकरणाचे काम मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रिया पूर्ण करुन काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

 लाकडी साकवासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी लवकरच

बैठक – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

ज्या ठिकाणी पूल नसतात, त्या ठिकाणी लाकडी साकवाचा वापर केला जातो. लाकडी साकवासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठक घेण्यासंदर्भात विनंती करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य राजन साळवी, भरत गोगावले, वैभव नाईक, ॲड.आशिष शेलार, दीपक चव्हाण, बाळासाहेब पाटील, शेखर निकम, विश्वजित कदम आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी लाकडी साकवासंदर्भातील प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता, त्यावेळी मंत्री श्री. चव्हाण यांनी उत्तरात ही माहिती दिली.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की,  कोकणात असे जवळपास चौदाशेपेक्षा हून अधिक साकव नादुरुस्त असून त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सदर दुरुस्ती ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेच्या निधीतून करण्यात येते. मात्र हे न झाल्याने बऱ्याच साकवांची दुरुस्ती राहिली आहे. साधारणपणे एका साकवासाठी 30 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. याबाबत काही निश्चित धोरण ठरविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल.

नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र

पोर्टलवर – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची भरती करण्यात येत असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य दिलीप वळसे- पाटील, धनंजय मुंडे, रोहित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. देवराव होळी, हरिभाऊ बागडे यांनी टीईटी परीक्षा घेऊन शिक्षण भरती करण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या काही काळापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. मात्र फेब्रुवारी – मार्च २०२३ मध्ये टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली असून याद्वारे राज्य शासन जवळपास ३० हजार शिक्षक भरती करणार आहे. विशेष म्हणजे शिक्षकांचा पदभरतीसाठी टीईटी परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाणार आहे.

२०१७ नंतर आता २०२३ मध्ये टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. गेल्या वेळी १२ हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करीत असून ७ हजार ९३० शिक्षकांची भरती करण्यात आली होती. आता शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी मिळाल्याने ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यात असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजित करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. टीईटी परीक्षेत दोषी असलेल्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

बंद नाहीउद्योग मंत्री उदय सामंत

 

लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रामधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) प्रकल्प बंद नसल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य रवींद्र वायकर, आदिती तटकरे, संग्राम थोपटे यांनी लोटे येथील औद्योगिक वसाहतीतील सामूहिक सांडपाणी प्रकल्पाच्या साठवण टाकीतील गाळ काढण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की,  लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रामधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) च्या साठवण टाकीतील गाळ काढण्याचे काम जानेवारीमध्ये मे.लोटे परशुराम प्रायव्हेट एनव्हायरमेंट को – ऑप सोसायटीमार्फत सुरु करण्यात आले. काही कारणांमुळे गाळ काढण्याचे काम मंदावले असले तरी आता गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या सांडपाणी प्रक्रिया करण्याचे काम सुरुळीत सुरु आहे. येणाऱ्या काळात राज्यातील सर्व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचा आढावा घेण्यात येईल.

 

केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार – मंत्री रवींद्र चव्हाण

आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील  केशरी शिधात्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य संतोष दानवे, अतुल भातखळकर आणि सुलभा खोडके यांनी राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्यांऐवजी थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

श्री. चव्हाण म्हणाले की, राज्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित आहे. गेल्या काही काळापासून केंद्र शासनामार्फत राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणारा गहू आणि तांदूळ देण्यात येत नसल्याने लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता प्रति माह प्रति लाभार्थी १५० रुपये इतकी रक्क्म लाभार्थींच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *