‘नाफेड’मार्फत औसा येथे हमीभावाने हरभरा खरेदीला प्रारंभ
- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची खरेदी केंद्राला भेट
लातूर, दि. 15 (जिमाका) : भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन महासंघाने (नाफेड) मंजुरी दिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतील हरभरा खरेदी केंद्र औसा येथे सुरु झाले आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या केंद्राला भेट देवून येथील खरेदीची पाहणी केली आणि अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करून नाफेडकडे विक्री करावी, असे आवाहन केले.
जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक श्री. नाईकवाडे, महाराष्ट्र बाजार समिती संघाचे उपसभापती तथा खरेदी विक्री संघाचे सभापती संतोष सोमवंशी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विलास सोमारे, तालुका सहनिबंधक अशोक कदम, तालुका कृषि अधिकारी श्री. ढाकणे, बाजार समिती सचिव संतोष हूच्चे, व्यवस्थापक गणेश क्षीरसागर यावेळी उपस्थित होते.
औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्यावतीने 2022-23 हंगामात हमीभावाने प्रतिक्विंटल 5 हजार 335 रुपये दराने हरभरा खरेदीस सुरुवात झालेली आहे. शासनाकडून हरभरा नोंदणीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. औसा येथील प्रथम शेतकरी विनायक कागे यांच्या हस्ते हरभरा खरेदीला यावेळी प्रारंभ करण्यात आला.