आज आठ लक्षवेधी होत्या. मात्र, सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले
मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात अजिबात रस नाही असे म्हणत अजित पवारांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन (Minister Absent) जोरदार टीका केली. हे अतिशय गलिच्छपणाचं कामकाज चालल्याचे अजित पवार म्हणाले. सभागृहात मुख्यमंत्री नसतील तर संसदीय कामकाज मंत्र्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात अजिबात रस नाही. यांना बाकीच्या कामातच रस असल्याचे अजित पवार म्हणाले. यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. अस बोलायला आम्हालाही योग्य वाटत नसल्याचे अजित पवार म्हणाले. सभागृहातील कामाकाजाला मंत्र्यांनी महत्त्व द्यायला हवं असंही अजित पवार म्हणाले.
मंत्र्यांची अनुपस्थिती, फडणवीसांची दिलगिरी
अजित पवार यांच्या वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेली बाब गंभीर आहे. काल रात्री एक वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज चालले. ऑर्डर ऑफ डे ही रात्री एक वाजता निघाली. त्यामुळे मंत्र्यांना ब्रिफींगला वेळ मिळत नाही. मात्र, सर्व मंत्र्यांना समज दिली जाईल. याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे फडणवीस म्हणाले
भाजप आमदारही नाराज
मंत्रिपदासाठी पुढे पुढे करता, पण कामकाजाच्या वेळी अनुपस्थित का राहता? असा सवाल करत भाजप (BJP) आमदार कालिदास कोळमकर (MLA Kalidas Kolambkar) यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आली आहे. सभागृहात आमदारांकडून मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहात केवळ एकाच लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी एकच मंत्री उपस्थित होते. इतर लक्षवेधीसाठी मंत्री अनुपस्थित असल्यामुळे तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आम्ही काल रात्री एक वाजेपर्यंत अधिवेशनात थांबलो होतो. लक्षवेधी आज लवकर असल्याने आम्ही लवकर अधिवेशनात आलो. मात्र, उत्तर देणारे मंत्री महोदय अधिवेशनात आलेले नाहीत. हे मंत्री अधिवेशनाला गांभीर्याने घेत नाहीत. नेमकं हे मंत्री कशासाठी झाले आहेत हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले. विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आल्याचे रोहित पवार म्हणाले.