‘इको ब्रिक्स’ च्या माध्यमातून घरातील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट
लातुर:-ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या मार्फ़त सुरू करण्यात आला उपक्रम. प्लास्टिक कचऱ्याचे विघटन करणे आव्हानात्मक असल्यामुळे पर्यावरणात हा कचरा वर्षानुवर्षे तसाच असतो. मोठ्या प्रमाणात हा कचरा जमिनीत मातीमध्ये मिक्स होत असल्याने मातीचा पोत नष्ट होत आहे. यावर उपाययोजना म्हणून शहरातील ग्रीन लातूर वृक्ष टीमच्यामार्फ़त
‘इको ब्रिक्स’ची मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्लास्टिकच्या विटांचा वापर करून बसण्यासाठी बेंचेस बनविण्याचे कार्य केले जात आहे.
यासाठी घरातील प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर ‘इको ब्रिक्स’ (प्लास्टिकच्या विटा) बनविण्यासाठी केला जात आहे.
याबाबत माहिती देताना ग्रीन लातूर वृक्ष टीमचे आकाश सावंत म्हणाले, मागील सात – आठ महिन्यात शहरातील विविध शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सांगून प्लास्टिक गोळा करण्यात आले. त्यातील मोठा वाटा हा घरगुती प्लास्टिक कचरा असल्याचे निदर्शनास आले होते. यात खाद्य पदार्थांचे प्लास्टिकचे आवरण जास्त होते, सोबत प्लास्टिक च्या कॅरी बॅग मोठ्या प्रमाणात होत्या.
घरातून जमा केलेला प्लास्टिक कचरा साफ करून ते पाण्याच्या रिकाम्या प्लॅस्टिकच्याच बाटली किंवा जारमध्ये भरून त्याचे इको ब्रिक्समध्ये रूपांतर केले.
याबरोबरच झाडे लावल्या नंतर शिल्लक काळ्या पिशव्या यांचा वापर देखील करण्यात आला. एक लिटर प्लास्टिकच्या बाटलीत दोनशे ते तीनशे ग्राम प्लास्टिक भरले जाऊ शकते. यामुळे साध्या मातीच्या विटांप्रमाणेच या प्लास्टिकच्या विटा पण मजबूत होतात. त्याचप्रमाणे कचऱ्याचेही प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. या कामासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी लकडे यांचेसह तांत्रिक मदती करिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे उपप्राचार्य एस. एस. जाधव, जे. के. चिताल, एम. जी. घोडके, के. एस. पटने, मुश्ताक पठाण, कृष्णा गंगणे यांनी सहयोग केले.
सुमारे ७२ किलो प्लास्टिक चा कचरा व २५० पाण्याच्या बाटल्या यांचा वापर करून जिल्हा क्रिडा संकुल येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बेंच बनविण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे बाळासाहेब बावणे, डॉ. पवन लड्डा, पदमाकर बागल, ऍड वैशाली यादव, पूजा पाटील, रोहिणी पाटील, अभिषेक घाडगे, गणेश सुरवसे, राहुल माने, दिपकजी नावाडे, आदित्यराज लोंढे, विदुला राजेमाने, विजय मोहिते, मोईझ मिर्झा, दिपाली राजपूत, हर्षदा बाचेपल्लेकर, पांडुरंग बोडके, शुभम आवाड यांनी परिश्रम घेतले.तरी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने लातूरकरांना विनंती करण्यात येते की, आपणही या कार्यात सहभाग नोंदवावा आणि आपल्या घरातील प्लास्टिक कचरा फेकून न देता एका प्लास्टिक बॉटल मध्ये भरून इको ब्रिक्स तयार करून आम्हाला देण्यात यावी.