• Wed. May 7th, 2025

महिलांना अर्ध्या तिकीटावर एसटी प्रवास; एप्रिलपासून योजनेची अंमलबजावणी

Byjantaadmin

Mar 15, 2023

महिलांना अर्ध्या तिकीटावर एसटी प्रवास; एप्रिलपासून योजनेची अंमलबजावणी

मुंबई:-एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून होईल.
योजनेमुळे सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकार महामंडळाला मिळेल. त्यातून उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक अडचणीतील लालपरीला नवसंजीवनी मिळणार आहे.

एसटी महामंडळातर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. आता राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे ६ कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी घेतला आहे.

सध्या दररोज सरासरी ५ लाखापेक्षा जास्त अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवास करतात. दरमहा ६५ ते ७० कोटी रुपये मिळतात. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात आणि विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला (प्रतिपूर्ती रक्कमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातूनत्यातून अडचणीतील लालपरीचा प्रवास सुरू आहे. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिलांना प्रवास दरात ५० टक्क्यांची सवलत लागू होईल. त्याचाही मोठा आधार लालपरीला मिळणार आहे.

लालपरीची सद्यःस्थिती

सध्या दररोज सरासरी ५०-५५ लाख प्रवासी करतात लालपरीतून प्रवास

एकूण प्रवाशांमध्ये अंदाजे ३० टक्के म्हणजेच १६ ते १७ लाख महिला प्रवासी

१२ वर्षाखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत

राज्यातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना प्रवासात १०० टक्के सवलत

महामंडळाचा दरमहा सरासरी खर्च ८५० कोटी व उत्पन्न ७२० कोटींपर्यंत आहे

नोकरदार व माहेरवासिनींना लालपरीचा आधार

एसटीने प्रवास न करणाऱ्या महिला सध्या पर्यायी वाहनांचा वापर करतात. अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी घेऊन ये-जा करतात. काही महिला वडाप, ॲटोरिक्षातून जातात. तर अनेकजण कुटुंबासोबत खासगी वाहनाचा वापर करतात. त्या महिला आता एसटीकडून ५० टक्के सवलत मिळणार असल्याने लालपरीतून प्रवास करतील. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळेल आणि अडचणीतील लालपरीची स्थिती सुधारेल, असा विश्वास महामंडळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *