चित्रपटांमध्ये जसे ‘पति पत्नी और वो’च्या बाबतीत घडते तसेच ग्वाल्हेरमध्ये घडले आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने लग्न होऊनही दुसरे लग्न केले होते. हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहोचले, मात्र न्यायालयाबाहेर अनोखा तोडगा निघाला. पतीने आठवड्यातून तीन दिवस एका पत्नीसोबत आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत घालवायचे असे ठरले. रविवारी मात्र पती स्वत:च्या मर्जीचा मालक राहील. तो त्या दिवशी त्याला वाटेल तसे राहू शकतो. पतीने दोन्ही पत्नींना प्रत्येकी एक फ्लॅट दिला आहे.
ग्वाल्हेरमधील 28 वर्षीय महिलेने आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच फॅमिली कोर्टात धाव घेतली होती. ती स्वत:च्या आणि मुलाच्या उदरनिर्वाहासाठी खटला दाखल करण्यासाठी आली होती, मात्र समुपदेशकाने तिला कोर्टात समजावून सांगितले, पती-पत्नी दोघांचेही समुपदेशन करून कोर्टाबाहेरच समझौता केला.
अशी आहे ‘पती-पत्नी और वो’ची संपूर्ण कथा…
फॅमिली कोर्टात पोहोचलेल्या ग्वाल्हेरची रहिवासी असलेल्या या महिलेचे 2018 मध्ये लग्न झाले होते. पती हरियाणातील गुरुग्राम येथे एका मल्टी नॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता आहे. पती-पत्नी दोन वर्षे एकत्र राहत होते. त्यांना एक मूलही आहे. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान पतीने पत्नीला ग्वाल्हेरमध्ये तिच्या माहेरच्या घरी सोडले, नंतर तिला घेण्यासाठी आला नाही.
दरम्यान, अभियंता पतीचे त्याच्या कंपनीत सोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी संबंध जुळले. तो तिच्यासोबत राहू लागला आणि नंतर त्यांनी लग्नही केले. त्याला दुसऱ्या पत्नीपासूनही एक मुलगी झाली आहे.
इकडे पहिली पत्नी आपला पती घेण्यासाठी येत नसल्याचे पाहून तिने तडक गुरुग्राम गाठले. तेथे तिला नवऱ्याने दुसरं लग्न केल्याचे समजले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या पत्नीने पतीविरोधात ग्वाल्हेरचे फॅमिली कोर्ट गाठले. तिला स्वतःच्या आणि मुलाच्या देखभालीसाठी केस दाखल करायची होती, पण तिने कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक हरीश दिवाण यांची भेट घेतली. ज्यांनी तिचे याप्रकरणी समुदेशन केले.
6 महिन्यांत 5 वेळा समुपदेशन
समुपदेशक अॅडव्होकेट हरीश दिवाण यांनी महिलेला समजावून सांगितले की, तिच्या आणि तिच्या मुलाच्या उदरनिर्वाहासाठी फक्त 7 ते 8 हजार रुपये मिळतील. यातून काय फायदा होणार होता? समुपदेशकाने महिलेच्या पतीशी फोनवर चर्चा केली. त्यालाही समजावून सांगितले. याप्रकरणी त्यांनी 6 महिन्यांत 5 वेळा समुपदेशन केले.
प्रकरण न्यायालयात पोहोचण्यापूर्वीच दोघांमध्ये समेट झाला होता. त्यानुसार पती आठवड्यातून तीन दिवस दोघींसोबत राहणार आहे. पतीला रविवारी सुटी असेल. त्याला वाटेल तिथे तो राहू शकतो. सुटीच्या दिवशी पतीवर पत्नीचे कोणतेही बंधन राहणार नाही. त्याला दोन्ही पत्नींसोबत राहता यावे यासाठी त्यांना गुरुग्राममध्ये प्रत्येकी एक फ्लॅट देण्यात आला आहे.
मुपदेशकांनी इंजिनिअरला सांगितले परिणाम
याप्रकरणी कोर्टात गेल्याने त्यांचे खूप नुकसान होऊ शकते, असे समुपदेशक हरीश दिवाण यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअरला समजावून सांगितले. त्यामुळेच त्यांनी न्यायालयाबाहेर चर्चा करून तडजोड करावी. यामुळे तोही आनंदी होईल आणि त्याच्या बायकाही आनंदी होतील.
समुपदेशकाने पतीला या गोष्टी समजावून सांगितल्या
- पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसऱ्या पत्नीला कायदेशीर दर्जा मिळू शकत नाही.
- अशा स्थितीत पहिली पत्नी हुंडाबळीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करू शकते.
- पहिली पत्नीही फॅमिली कोर्टात केस दाखल करू शकते. तुम्हाला सतत पोलिस आणि कोर्टात चकरा माराव्या लागतील.
- एफआयआर नोंदवल्यानंतर नोकरीही धोक्यात येऊ शकते.
- दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागल्याने तुम्हाला त्रास होईल.
समुपदेशक म्हणाले – समझौता घडवून आणला
कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक हरीश दिवाण सांगतात की, मी दोन्ही पक्षांमध्ये बोलणी करून तोडगा काढला आहे. नवरा आणि दोन्ही पत्नी यासाठी तयार आहेत. पतीने दोन्ही पत्नींची जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन दिले आहे. अशा स्थितीत न्यायालयासमोर हे प्रकरणावर येण्यापूर्वीच तोडगा निघाला आहे.