• Mon. May 5th, 2025

सुभाष देसाईंच्या मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपामधून विरोध; थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र!

Byjantaadmin

Mar 14, 2023

ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाई यांचा प्रवेश झाला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. भूषण देसाईंच्या प्रवेशाचं वृत्त जाहीर होताच थेट सुभाष देसाईंबाबतही चर्चा सुरू झाल्या. मात्र, त्यावर सुभाष देसाईंनी आपली निष्ठा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवरच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या मुद्द्यावरून राजकीय दावे चालू असून आता भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपामधूनच विरोध होताना दिसत आहे. यासंदर्भातलं एक पत्रही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवण्यात आलं आहे.

“भ्रष्ट नेत्यांच्या मुलांना प्रवेश देऊ नका”

एकनाथ शिंदे यांना भाजपाचे गोरेगावमधील विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी पत्र लिहिलं आहे. यामध्ये भ्रष्ट नेत्यांच्या मुलांना प्रवेश देऊ नका, अशी मागणी करण्यता आली आहे. संदीप जाधव यांनी टीव्ही ९ वर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “सामाजिक क्षेत्रात कवडीचीही किंमत नसलेले चिरंजीव भूषण सुभाष देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हे अतिशय वेदनादायक आहे. कारण ज्या माणसानं कधीही सामाजिक बांधिलकी जपली नाही, सामाजिक क्षेत्रात एक इंचाचंही काम नाही, फक्त भ्रष्टाचाराने हात बरबटलेलं व्यक्तिमत्व अशी ज्यांची ओळख आहे, अशा व्यक्तीला शिवसेना शिंदे गटानं प्रवेश दिला. यावर गोरेगावकरांच्या तीव्र भावना आहेत. आमचा याला विरोध आहे”,असं संदीप जाधव म्हणाले आहेत.

दरम्यान, भूषण देसाईंनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुभाष देसाईंनी दु:ख व्यक्त केलं आहे. “माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही”, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाईंनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *