खोपोली (जि. रायगड) : खालापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेल्या वरिष्ठ पदाधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा स्वगृही म्हणजे ठाकरे गटात सामील झाले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिंदे गटाला धक्का मानला जात आहे.
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये मोठा संघर्ष सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले. या दरम्यान अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, फसगत होत झाल्याचा अनुभव आल्यावर तांबाटी येथील शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी अविनाश आमले यांनी आपल्या १५० हून अधिक सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा स्वगृही येण्याचा निर्णय घेतला.अविनाश आमले यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, सहसंपर्कप्रमुख भाई शिंदे, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमले यांच्यासोबत त्यांच्या दीडशेहून अधिक सहकाऱ्यांनीही शिवबंधन हाती बांधले बाहे.
या प्रवेशा प्रसंगी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळबे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निखिल पाटील, सचिव प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, सहसंपर्कप्रमुख अविनाश भासे, अशोक बामणे, रंजना राणे, तानाजी सावंत, तुषार मुंढे आदींसह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.