• Sun. May 4th, 2025

“भाजपात सगळे दुधाने धुतलेले…” मुश्रीफांवरील ईडीच्या कारवाईनंतर नाना पटोलेंची तिखट प्रतिक्रिया

Byjantaadmin

Mar 11, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने जानेवारी महिन्यात छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा मुश्रीफांच्या घरांवर ईडीने धाडी टाकल्या. मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तेची इडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांची देखील ‘ईडी’च्या पथकाकडून शुक्रवारी चौकशी करण्यात आली. ईडीच्या या कारवाईनंतर महाराष्ट्राचं राजकारण तापू लागलं आहे.

एकीकडे मुश्रीफ समर्थक रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष मुश्रीफांच्या सोबत उभे आहेत. या कारवाईवरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपावर टीका करू लागले आहेत. मुश्रीफ यांच्या घरांवरील ईडीच्या छापेमारीबद्दल विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “भाजपा हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे. त्यांचा विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण अनिल देशमुखांचं प्रकरण नुकतंच पाहिलं आहे. परमवीर सिंहांनी जे काही आरोप केले त्याची काही चौकशी झाली नाही.”

पटोले म्हणाले की, “अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप केला होता. परंतु त्यांना या प्रकरणात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एका निरपराध माणसाला दीड वर्ष तुरुंगात राहावं लागलं. त्यांच्यावर जे काही आरोप झाले त्यापैकी एकाही प्रकरणात ईडी किंवा सीबीआयकडून कारवाई झालेली नाही. परंतु अशा कारवाईनंतर जे लोक भाजपामध्ये गेले ते स्वच्छ झाले. यांच्याकडे (भाजपा) गेलेल्या लोाकंची चौकशी का झाली नाही? एबीपी माझाशी बोलताना पटोले यांनी सवाल केला की, “भाजपात काय सगळे दुधाने धुतलेले लोक आहेत का?”

नागपूर भाजपच्या नेत्यांकडे पैसे आले कुठून? : पटोलेंचा सवाल

पटोले म्हणाले की, “नागपुरात भाजपचे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे साधी स्कूटर नव्हती, त्यांच्याकडे आता हेलिकॉप्टर आहे. या नेत्यांनी आता मोठमोठे बंगले बांधले आहेत, फार्महाऊस बांधले आहेत. हे पैसे आणले कुठून? याची चौकशी होणार आहे का?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *