महिला म्हणून आपण कार्ड न वापरता स्वत: सिद्ध झाले पाहिजे – सौ. वृषालीताई पाटील निलंगेकर
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व महिला सबलीकरण कक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सौ. वृषालीताई विजयकुमार पाटील निलंगेकर यांनी उपस्थित विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, भविष्यात आपण केवळ महिला म्हणून कार्ड वापरू नये तर आपल्यासमोर असणाऱ्या संधींसाठी स्वता: सिद्ध झाले पाहिजे. आज प्रगतीशील भारतामध्ये महिलांचे कौतुक होते आहे, मान सन्मान दिला जातो याचे मुख्य कारण म्हणजे महिलांनी विविध क्षेत्रामध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. स्त्री असण्याचा उपयोग आपण कुटुंबाप्रमाणेच समाज व देशाच्या जडणघडणीत केला पाहिजे. आपल्या असण्याने आपले वातावरण सुंदर, आल्हाददायक बनवले पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करीत असताना स्वताचा व समाजाचा मान सन्मान जपला पाहिजे स्वत:ची आपण ओळख निर्माण करत असताना ती आपल्यातील गुणांनीच ओळख होते. ती आपण जपली पाहिजे अशा शब्दात आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. श्रीमती आर. डी. खराटे उपस्थित होत्या. त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करीत असताना स्त्री हक्कांच्या संदर्भातील विविध कायदे सांगून या कायद्यांचा स्त्रियांनी गैरवापर करू नये. कायद्यांचा वापर प्लेईंग कार्ड म्हणून करू नये. महिलांना स्वताचे संरक्षण स्वत: करता आले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात महिला आज पुढे आहेत त्यांनी स्वताला सिद्ध केले आहे. समाजातील प्रत्येक स्त्रीला मान दिला पाहिजे आणि कायद्याचे पालन केले पाहिजे. त्यातूनच समृद्ध समाज निर्माण होईल असे मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश श्रीमती एन.ए. एल. शेख यांनीही पूर्वी पुरुषप्रधान संस्कृतीत महिला बळी पडल्या पण आता ही स्थिती बदलली आहे. आजची पिढी अबला नाही तर स्पर्धा पार करून पुढे जाणारी ही पिढी आहे. सक्षम पिढीमध्ये आज आपण वावरतो आहोत. तेंव्हा प्रत्येक क्षेत्रातील संधी आपण मिळवल्या पाहिजेत असे आवाहन केले. यावेळी सरकारी वकील सौ. एल. यु. कुलकर्णी यांनीही महिलाविषयक कायदे सांगून उपस्थितांमध्ये जागृती निर्माण केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले. महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
वाणिज्य विभागाच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा भारतीय परंपरेचा या उपक्रमातून विविध प्रांताच्या वेशभूषेत विद्यार्थीनींची स्पर्धा घेण्यात आली. त्याचेही कौतुक मा. वृषालीताई पाटील निलंगेकर यांनी केले. याच कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. प्राजक्ता पांचाळ, सुलक्षणा जगताप यांनी केले तर आभार डॉ. व्ही.पी.सांडूर यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. भास्कर गायकवाड, डॉ. अरुण धालगडे, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. गोपाळ मोघे, डॉ. नरेश पिनमकर इत्यादी प्राध्यापकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला सबलीकरण कक्षाच्या प्रा. मीनाक्षी बोंडगे, प्रा. वारद मनीषा, प्रा. घोगरे मनीषा, प्रा. भाग्यश्री मंगरुळकर, प्रा. सोनम पाटील, प्रा. शहापुरे, श्री दिलीप सोनकांबळे, श्री उमाजी तोरकड, श्री मनोहर एखंडे, श्री सिद्धेश्वर कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.