समर्पणाने कार्यप्रवण झाल्यास यश साकार होते
– हभप चैतन्य महाराज देगलूरकर
विश्व ट्रॅव्हल्सच्या लातूर-तिरुपती बस सेवेचा शुभारंभ
लातूर/प्रतिनिधी:ध्येय डोळ्यासमोर ठेवून समर्पणाने कार्यप्रवण झाल्यास स्वप्न साकार होते.विश्व ट्रॅव्हल्स आणि सुनिल देशपांडे हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे मत हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.
विश्व ट्रॅव्हल्सच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लातूर ते तिरुपती बालाजीच्या दर्शनासहित बससेवेचा शुभारंभ हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आला,यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ.अभिमन्यू पवार,लातूर अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी,टाटा मोटर्सचे सीनियर सेल्स मॅनेजर निमेश मैसुरिया,
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये,पोलीस निरीक्षक गणेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आशीर्वचनपर मार्गदर्शन करताना देगलूरकर महाराज म्हणाले की,विमानातील सुविधा बसमध्ये उपलब्ध करून देण्याचे स्वप्न सुनिल देशपांडे यांनी पाहिले होते.त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.यामुळेच विश्व ट्रॅव्हल्स आज २१ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.विश्व ट्रॅव्हल्स ही नियमात चालणारी कंपनी आहे.म्हणूनच ती सर्वांना आवडते.विश्व ट्रॅव्हल्स प्रवाशांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.ही कंपनी २१ वर्षांची झाली म्हणजे आता तारुण्यात आहे.या टप्प्यावर धोका आणि विश्वास दोन्ही आहे.विश्व ही विवेकी व सुविचारी कंपनी असल्याचेही ते म्हणाले.
आ.अभिमन्यू पवार यांनी विश्व आणि विश्वास यांचे अतूट नाते असल्याचे सांगितले.विश्व ट्रॅव्हल्स कडून प्रवाशांना उत्तम सेवा पुरवली जाते.त्यामुळेच या कंपनीसोबत प्रवाशांचेही नाते जुळले असल्याचे ते म्हणाले.
प्रदीप राठी यांनी देशात धार्मिक पर्यटन वाढत असल्याचे सांगितले.विश्व या नावातच या कंपनीची संकल्पना स्पष्ट होते. निष्ठा,श्रद्धा व प्रामाणिक कार्य केल्यामुळे ही कंपनी नावारुपाला आली असल्याचे ते म्हणाले.
टाटा मोटर्सचे निमेश मैसुरिया यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात सुनिल देशपांडे यांनी अवघ्या दोन टॅक्सी पासून व्यवसायास प्रारंभ केल्याचे सांगितले.२१ वर्षांच्या काळात १० लाख प्रवाशांपर्यंत पोहोचलो. अभिमान वाटावा असे कर्मचारी मला मिळाले.प्रवाशांच्या पाठबळावर व्यवसायाचा विस्तार होत गेला,असेही ते म्हणाले. नव्याने सुरू होणारी लातूर ते तिरुपती बस दर मंगळवारी दुपारी २ वाजता लातूर येथून निघेल. बुधवारी सकाळी तिरुपती येथे पोहोचेल.तेथे दोन व्यक्तींमध्ये एक खोली फ्रेश होण्यास दिली जाईल.त्यानंतर पद्मावती, तिरूमला व तिरुपती दर्शन होइल.दर्शनानंतर खरेदीसाठी कांही वेळ असेल.रात्रीचे जेवण करून बस परतीच्या प्रवासाला निघेल आणि गुरुवारी दुपारी लातूर येथे पोहोचेल,अशी माहिती त्यांनी दिली.याही सेवेचा विस्तार करत भक्तांना शुक्रवारी व्यंकटेशाच्या दर्शनाची सुविधा आम्ही उपलब्ध करत आहोत.ज्या भक्तांनी दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था किंवा नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी आठवड्यातून केवळ जाण्या-येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बस सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.श्रीफळ वाढवून नव्या बसचे उद्घाटन करण्यात आले.विश्व ट्रॅव्हल्सच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उपरणे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कर्मचाऱ्यांना बळ देणारी मातृशक्ती अर्थात कुटुंबातील महिलांचा साडी-चोळी व ओटी भरून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन सुनिल अयाचित तर आभार प्रदर्शन डॉ.शशांक कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमास लातूर शहर व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
https://jantaexpress.co.in/?p=4820