• Fri. May 2nd, 2025

दोन वेळा भाजप खासदार राहिलेले हरिभाऊ राठोड KCR यांच्यासोबत, BRS पक्षात प्रवेश

Byjantaadmin

Mar 8, 2023

२ वेळा भाजप खासदार राहिलेले हरिभाऊ राठोड KCR यांच्यासोबत, BRS पक्षात प्रवेश

यवतमाळ/मुंबई – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. गेल्याच महिन्यात केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी ‘अब कि बार किसान सरकार’चा नारा दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले होते. यावेळी अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. आता, महाराष्ट्रातील एका माजी खासदारानेही बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे. भटके विमुक्त समाजाचे राष्ट्रीय नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भारतीय राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. यापूर्वी ते आम आदमी पक्षाचे काम करत.

भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष असा प्रवास करीत हरिभाऊ आता ‘बीआरएस’मध्ये दाखल झाले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत राठोड यांनी बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आम आदमी पार्टी ही देशातील चांगली पार्टी आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांचं कामही चांगलं आहे. परंतु, त्याहीपेक्षा भारत राष्ट्र समिती अधिक चांगली असून, ती गोरगरीब, दलित आणि खास करून शेतकऱ्यांची पार्टी आहे. गोरगरीब आणि शेतकरी यांसंदर्भात अनेक चांगल्या योजना या पक्षाकडे आहेत. या सर्व बाबींचा विचार करून मी इकडे आकर्षित झालो. राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नासंदर्भात जाण असणारे एकमेव नेते म्हणजे चंद्रशेखर राव आहेत असा विश्वासही राठोड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भटके विमुक्त, बंजारा, ओबीसी यांच्यासाठी ते कायम आंदोलन, मोर्चे काढत असतात. राठोड यांना कायम सत्तेच्या परिघात राहायला आवडते, अशी टीका त्यांच्यावर नेहमीच केली जाते. हरिभाऊ राठोड भाजपकडून दोन वेळा खासदार राहिले. मनमोहन सिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर सभागृहात गैरहजर राहून राठोड यांनी भाजपला तोंडघशी पाडले. त्यांनतर भाजपने राठोड यांना बेदखल केले.  यवतमाळमधून आता ते भारतीय राष्ट्र समितीचं काम करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *