21 वे शतक हे जागतिक स्पर्धेचे शतक आहे, असे मी अनेकवेळा ऐकले होते. परंतु स्पर्धेच्या युगात आपणही सहभागी व्हावे ही मनस्वी ईच्छा होतीच पण प्रश्न असा होता की, या स्पर्धेत सहभागी नेमके कोणत्या माध्यमातून व्हावे? आणि चटकण मनात विचार आला की, आपण गृहउद्योगातून नवनिर्मितीचा मार्ग अवलंबवावा आणि मग श्रीगणेशा झाला तो “गंगुआज्जी होममेड मसाला” उद्योगाच्या माध्यमातून.
मी सौ.अंजली संभाजीराव पाटील रा.रावणगांव ता.भोकर जि.नांदेड येथील रहिवासी बालपण देळूब ता.अर्धापूर येथे गेलेले. दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर विवाह आणि रावणगाव येथे सासरी गृहिणी म्हणून सर्व जबाबदार्या पार पाडल्या. बालपणापासूनच स्वतः काहीतरी नवीन ध्येय गाठावे ही उर्मी मनात असायची काळाच्या ओघात मुलांच्या व कुटुंबाच्या जबाबदार पालकांच्या भूमिकेतून मी व माझे पती संभाजीराव पाटील यांनी संस्कार, मुल्यांचे धडे मुलांना देवून त्यांना जबाबदार नागरिक बनविले आणि या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
आपण उद्योजिका व्हावचेच हे ठरवून अनेक उद्योगांमधून मसाला उद्योगाची निवड केली. यानंतर मसाला उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, यंत्रसामग्री, व्यावसायासाठी जागा, मनुष्यबळ, कामगार, पॅकेजींग, मार्केटिंग, बाजारपेठेतील मागणी, जाहिरात व उत्पादन क्षमता या सर्व घटकांचा प्रत्यक्ष अभ्यास केला.
आपला उद्योग दर्जेदार व्हावा व मसाल्यांची शुध्दता आणि चव सर्वोत्कृष्ठ असावी यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण घेतले आणि प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. सुरुवातीला काळामसाला, तांबड्या मसाल्यापासून सुरु झालेेला हा उद्योग आता व्हेज, नॉनव्हेजसह चिकन, मटन मसाला, पनीर मसाला, छोले मसाला ते चहा मसाल्यापर्यंत “गंगुआज्जी होममेड मसाला” पोहचला असल्याचे दिसून येत आहे.
या मसाल्यांना “गंगुआज्जी होममेड मसाला” नाव देण्याचे कारण म्हणजे माझ्या सासरी माझ्या पणजी सासू यांचे नाव गंगुआज्जी होते आणि त्यांच्या हातून तयार झालेला मसाला त्या काळी सबंध पंचक्रोशीत प्रसिध्द असायचा खर्या अर्थाने गंगुआज्जीचा मसाला म्हणजे त्या काळचे आमच्या कुटुंबाचे ते पारंपरिक पेटंट होते म्हणून आम्हीही या उद्योगाला “गंगुआज्जी होममेड मसाला” हे नाव दिले.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील एक प्रतिथयश संस्था असलेल्या माणदेशी संस्थेशी जवळचा संबंध आला. व्यावसायीक नाते दृढ झाले, माणदेशीने आमच्या उद्योगाच्या पंखात बळ आले.
वास्तविक पहाता कारोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये तंत्रशुद्ध पध्दतीने मला मसाल्याचे सर्वोकृष्ठ प्रशिक्षण देण्यात आले. याचा खूप मोठा फायदा झाला. माणदेशीने उद्योग उभारणीसाठी मदत तर केलीच परंतु आमच्या मसाल्याची गुणवत्ता तपासून आमच्या उद्योगाला मसाल्याची मोठी ऑर्डरही दिली. त्यामुळे माझ्या व्यवसायाला चांगली सुरूवात झाली. माणदेशीच्या तंत्रशुध्द प्रशिक्षणाचा महत्त्वाचा फायदा असा झाला की, आज मी माझा व्यवसाय सांभाळून माणदेशीमध्ये दर महिण्याला 100 ते 120 महिलांना प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देत आहे. व्यवसायाबरोबर प्रशिक्षक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाल्याने मी माणदेशीची विशेष ऋणी आहे.
एकंदरीत महिलांना उद्योजिका बनविण्याचे माणदेशीचे जे ध्येय आहे, त्यात खारीचा वाटा म्हणून माझा सहभाग आहे. याचा मला आज मनस्वी आनंद आहे. उद्योगक्षेत्रात महिलांच्या आत्मनिर्भर प्रगतीसाठी माणदेशी करत असलेल्या तेजस्वी कार्यास सल्युट आहे. मला वाटते माणदेशी संस्था म्हणजे परीस आहे. जिथे-जिथे माणदेशीच्या परीसस्पर्श होईल त्यांचे निश्चितच सोने होईल. खर्या अर्थाने या उद्योगाचा पाया घालण्याची प्रेरणा मिळाली ती माझ्या नणंद आणि शैक्षणिक, समाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या लातूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर मॅडम यांच्याकडूनच माझ्या यशाचे सर्व श्रेय मी त्यांनाच देते. याबरोबरच माझे पती संभाजीराव पाटील यांनी या व्यवसाय वृध्दीसाठी पूर्ण सहकार्य केल्यामुळेच मी हा मसाला उद्योग उभा करू शकले, हे सर्वप्रथम मी प्राजळपणे नमुद करू इच्छिते.
आमच्या मसाल्याची जाहिरात आम्ही प्रत्यक्ष स्टॉलवरून वेगवेगळ्या ठिकाणी केली. बचतगट, कृषी मेळावे, कुटीरोद्योग, प्रदर्शन स्थळ ते ऑनलाईन विक्रीची सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे. आता आम्ही महाराष्ट्रात सर्व भागात विविध मॉल्स बाजार, व किरकोळ दुकानापर्यंत पोहचलो आहोत. उच्च दर्जा, उत्तम स्वाद, स्वच्छ ताजा व रूचकर मसाला म्हणून आता “गंगुआज्जी होममेड मसाला” ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरला आहे. एकंदरीत उद्योग उभारणीनंतरचा अनुभव हा खूप चांगला असून या उद्योगातून लोकसेवेबरोबरच माझा उद्योग उभारून उद्योजिका होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. एवढे मात्र निश्चित.
“मुंबई महोत्सव” दि.05 ते 08 जानेवारी 2023 स्टॉल क्र.ए-17 मुंबई महोत्सव हा माझ्यासाठी यावर्षी पहिलाच अनुभव होता. आतापर्यंत फक्त ऐकलच होतं. मुंबई महोत्सव हा असतो. आता प्रत्यक्ष अनुभवल्यावर असा वाटतय माणदेशी परिवारामधील मॅडमनी आपापली जबाबदारी 100 टक्के योग रितीने पार पाडण्यासाठी अहोरात्र झटत राहील्या. हे डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. कुणालाही काही कमी पडू नये म्हणून प्रत्यक्ष एक व्यक्तीची आपुलकीने चौकशी केली. त्यांच्या त्या अडचणीवर लगेच तोडगा काढून मार्ग काढला आणि प्रत्येकाला कसा फायदा होईल? जास्त सेल कसा होईल? हे ही त्यांनी बारकाईने लक्ष दिले. खरच माणदेशी महोत्सवाची तारीख ठरल्यापासून तो पार पडण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्व माणदेशी परिवार व त्यातील सर्व स्टाफ 24 तास फक्त महोत्सवाचे नियोजन आणि योग्य रितीने व्यवस्थित चांगल्या पध्दतीने कसा पाडता येईल. यासाठी परिश्रम घेत राहिल्या ते सर्व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. माणदेशी परिवाराचे खूप-खूप आभार आम्हाला आमच्यासारख्या नवशिक्या उद्योजिकांना मुंबईसारख्या ठिकाणी छान मार्केट उपलब्ध करून दिले. खासकरून वैयक्तिकरित्या आमची चौकशी करून आमच्या अडचणी सोडवून आम्हाला व्यवसाय करण्याची एक छान सुवर्णसंधी दिली. त्याबद्दल माणदेशी परिवाराचे शतशहाः आभार.
चेतना गाला(सिन्हा) मॅडम, वनिता मॅडम, यांचेसुध्दा शतशः आभार व्यक्त करते. त्यांनी महिलांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली तसेच चेतना मॅडम यांनी प्रत्येक स्टॉलला स्वतः भेट देवून पाहणी केली. त्याबद्दल परत एकदा माणदेशी परिवाराचे खूप-खूप आभार. तसेच लातूर ब्रँचच्या प्रतिमा मॅडम, सुवर्णा मॅडम यांचे सुध्दा खूप-खूप आभार
– सौ. अंजलीताई संभाजीराव पाटील
संचालिका- “गंगुआज्जी होममेड मसाला”
लातूर मो. -9975635093
जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख :अंधाराकडून प्रकाशाकडे झेपावणारा “गंगुआज्जी होममेड मसाला”
