• Thu. May 1st, 2025

अजित पवारांची ग्वाही:अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान, अधिवेशनात आवाज उठवणार, शेतकऱ्यांनी चिंता करू नये

Byjantaadmin

Mar 7, 2023

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर आवाज उठवू. शेतकऱ्यांनी चिंता करू नये, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल

अहमदनगर येथे एका जाहीर सभेत अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, हवामान विभागाने राज्यात 6 ते 8 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीठ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली द्राक्ष, हरभरा, सोयाबीन, कापूस, कांदा ही रब्बी पिके धोक्यात आली आहे. आधीच दर नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यात हे अस्मानी संकट पुढे उभे ठाकले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी चिंता करू नये. उद्या होणाऱ्या अधिवेशनात यावर आम्ही आवाज उठवू व शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू.

वाईट विचारांचे होळीत दहन

दरम्यान, राज्यभरात आज धुलिवंदनाचा उत्साह आहे. अजित पवार यांनीही राज्यातील नागरिकांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार म्हणाले, यंदाची होळी समस्त महाराष्ट्रवासियांच्या जीवनात रंगांची उधळण, आनंदाची बहार घेऊन येवो. समाजातील द्वेषभावना, वाईट विचारांचे होळीत दहन होऊन नष्ट होवोत. परस्परातील स्नेह, आपुलकी, बंधुत्वाची भावना वाढीस लागो. समाजात उत्साह, चैतन्याचं वातावरण निर्माण होवो.

आरोग्याची काळजी घेत सण साजरा करा

अजित पवार यांनी म्हटले आहे की, राज्यातील गावागावात, देश-विदेशात साजरा होणाऱ्या होळी, धुलीवंदनाच्या सणाला प्राचीन संदर्भ, ऐतिहासिक महत्व आहे. सर्वांना एकत्र आणणारा, समाजातील एकता, बंधुता, समानतेची भावना वाढीस लावणारा, निसर्गाचे महत्व सांगणारा हा सण आहे. सर्वांचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचे भान ठेवूनचं हा सण साजरा केला पाहिजे. होळीसाठी वृक्षतोड न करणे, धुलिवंदनासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करणे, रंग लावताना डोळ्यांना, शरीराला इजा होणार नाही, याची काळजी घेणे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, सर्वांनी हा सण आनंदाने, उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *