• Thu. May 1st, 2025

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाची शक्यता:हवामान विभागाचा गारपिटीचाही इशारा

Byjantaadmin

Mar 7, 2023

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. आज दिवसभर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळी पाऊस तसेच गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पावसाने निम्म्याहून अधिक महाराष्ट्र व्यापल्याचे चित्र आहे.

पुणे हवामान विभागाने जारी केलेले उपग्रह छायाचित्र. यामध्ये उत्तरेकडील राज्य अवकाळी पावसाच्या ढगांनी पूर्णपणे व्यापल्याचे दिसत आहे. तर, निम्म्याहून अधिक महाराष्ट्र अवकाळीने व्यापला आहे.
पुणे हवामान विभागाने जारी केलेले उपग्रह छायाचित्र. यामध्ये उत्तरेकडील राज्य अवकाळी पावसाच्या ढगांनी पूर्णपणे व्यापल्याचे दिसत आहे. तर, निम्म्याहून अधिक महाराष्ट्र अवकाळीने व्यापला आहे.

8 मार्चपर्यंत राज्यावर अवकाळीचे ढग

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणापासून मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. नैर्ऋत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. 8 मार्चपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर अवकाळीचे ढग दूर होतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, रविवारी पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

पावसासह वादळी वारे

आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील. विजा आणि मेघगर्जनांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची इशारा आहे.

पिके वाचवण्याची धडपड

पावसामुळे पपईचे नुकसान होऊ नये म्हणून नंदूरबार येथे शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
पावसामुळे पपईचे नुकसान होऊ नये म्हणून नंदूरबार येथे शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

पिकांचे मोठे नुकसान

राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच कापूस, कांदे व फळपिकांना योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर ऐन होळीच्या सणात नवे विघ्न ओढवले. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, गहू आणि डाळिंबासह भाजीपाला पिके अक्षरश: उद‌्ध्वस्त झाली. नंदुरबार जिल्ह्यातील मोग्रणी गावालाही गारपिटीचा तडाखा बसला. या दोन्ही जिल्ह्यांतील गहू, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे रब्बी पिकांची कापणी लवकर पूर्ण करा, असा सल्ला कृषि तज्ज्ञांनी दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *