भूतान देशाच्या शिष्ट मंडळाची लोदगा येथील बांबू प्रकल्पास भेट.
लातुर:-भूतान या देशातील बांबू क्षेत्रात काम करणाऱ्या बारा लोकांचे शिष्टमंडळ लातूर जिल्ह्यातील लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशन च्या बांबू प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले होते. या शिष्टमंडळामध्ये बांबू क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कारागिरांचा तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधीचा समावेश होता, सार्क डेव्हलपमेंट फंड या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून या भेटीचे आयोजन करण्यात आले होते सार्क डेव्हलपमेंट फंड या संस्थेमार्फत सार्क अंतर्गत येणाऱ्या विविध देशांमधील बांबू कारागिरांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असून या देशांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या देशांमध्ये बांबूत होणारे उत्कृष्ट काम या बांबू क्षेत्रात काम करणाऱ्या विविध लोकांना पाहता यावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोदगा येथील
बांबू प्रकल्पाला भेट दिल्यामुळे आम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकता आल्या असं मत प्रदर्शन भूतान हून आलेल्या बांबू कारागीरांनी व्यक्त केले, या भेटीदरम्यान या मंडळाला बांबूवर सादरीकरण करण्यात आले तसेच बांबू पासून बनणाऱ्या फर्निचरच्या कारखान्याला भेट देऊन त्यांनी बांबू फर्निचर कसे बनते त्याचे प्रत्यक्ष पाहिले तसेच बांबू पासून बनणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन सुद्धा या शिष्टमंडळाने पाहिले व या सर्व वस्तू बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. फिनिक्स फाउंडेशन च्या वतीने आंतरराष्ट्रीय बांबू तज्ञ श्री संजीव करपे यांनी या शिष्टमंडळास मार्गदर्शन केले, यावेळी फिनिक्स फाउंडेशन चे परवेज पटेल उपस्थित होते. पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्ष बांबू या क्षेत्रात विशेष काम करण्यात येत असून याची दखल केवळ भारतातच नाही तर परदेशातील लोक सुद्धा घेत आहेत. लोदगा येथील बांबू केंद्र हे आता जगातील बांबूतील महत्वाचे केंद्र बनले आहे.