• Thu. May 1st, 2025

बांधकाम कामगारांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन

Byjantaadmin

Mar 6, 2023

बांधकाम कामगारांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन

लातूर, (जिमाका) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना मंडळाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना मंडळाकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. काही अनधिकृत व्यक्तींकडून मंडळाच्या अस्तिवात असलेल्या किंवा मंडळाने घोषित न केलेल्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवून कामगारांची आर्थिक फसवणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा व्यक्ती व अफवांना बळी न पडण्याचे आवाहन लातूरचे सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांची माहिती WWW.MAHABOCW.IN या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध आहे. तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या पसायदान कॉम्पलेक्स, नवीन रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर येथील कामगार सुविधा केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधून योजनांची माहिती घ्यावी. बांधकाम कामगारांनी या व्यतिरिक्त कोणत्याही त्रयस्थ व अनाधिकृत व्यक्तीच्या अमिषाला बळी पडू नये. तसेच अशा व्यक्तींकडून नोंदणी, नुतणीकरण व लाभाच्या अर्जांसाठी पैशाची मागणी होत असल्यास अशा व्यक्तीविरुध्द संबंधित पोलीस विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या लातूर कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *