संभाजीनगर, 06 मार्च : अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झाले आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. अशातच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
सिल्लोडच्या अंधारी गावात ही घटना घडली आहे. एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय 46), जनार्दन सुपडू तायडे (वय 55 वर्षे) अशी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातून गेले. त्यानंतर आता शेतात लावलेले टरबुजाचे म्हणावे तसे उत्पन्न झाले नाही. त्यातच डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर या निराशेपोटी या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
भागिनाथ पांडव यांच्याकडे तीन एकर शेती आहेत. त्यात त्यांनी टरबुजाची लागवड केली होती. मात्र,अपेक्षित उत्पादन झाले नाही. यामुळे कर्ज फेडायचे कसे, यामुळे ते तणावात होते. त्यांनी शुक्रवारी शेतातील घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारी जनार्दन तायडे यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदरील घटना रविवारी सकाळी निदर्शनास आली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ते ठोक्याने जमीन कसायचे. यात त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्यामुळे ते सतत चिंतेत होते. यातून त्यांनी हे पाऊल उचलले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत शेतकऱ्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.