कुणी एकदा राजकारणात पडले की त्यांची पुढची पिढी देखील आपली राजकीय वाट चोखाळू लागते. वडील आमदार मुलगा किंवा सून खासदार किंवा एकाच घराभोवती राजकीय केंद्र स्थान असणे यात काही नवे नाही, याची अनुभूती आता एमआयएममध्येही येताना दिसून येत आहे. एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचे पुत्र बिलाल जलील यांच्या राजकीय लाँचिगसाठी अनेक कार्यक्रमात त्यांना पुढे करताना दिसून येत आहे.
एमआयएमच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी एमआयएमने महाराष्ट्राची निवड केली होती. यात बिलाल जलील यांच्या टीमनेच संपूर्ण नियोजन केले आहे. राज्याची निवड तसेच राज्यात पक्ष बांधणीसाठी देण्यात आलेले लक्ष यावरून एमआयएमची ताकद राज्यात वाढणार का असा प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे.
गेली अनेक दिवस छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हे चर्चेत आले आहेत. मात्र शहराच्या राजकारणत त्यांनी आपल्या मुलाला सक्रिय केल्याचे चित्र दिसून येत आहे. अगदी वेगवेगळया कार्यक्रमात असो की पक्षीय हायकंमाडसोबत वाढत असलेली जवळील यामुळे आगामी मनपा निवडणुकीसाठी खासदार जलील यांच्या मुलाला संधी मिळणार अशी चर्चा पक्षात सुरू झाली आहे.

मागील काही काळापासून खासदार इम्तियाज जलील हे मुलाच्या राजकीय लाँचिगसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. याचीच तयारी म्हणून एमआयएमची दुचाकी रॅली असो की खासदार चषक प्रत्येक कार्यक्रमात बिलाल जलील हा युथ आयकॉन असल्याच्या चर्चांना एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून उधाण येताना दिसून येत आहे.
कदम, श्रीकांत शिंदेंशी मैत्री
खासदार जलील यांचे शिवसेनेच्या तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांच्यासोबत मैत्रीचे संबंध होते, 2014 ते 2019 च्या काळात कटकट गेट परिसरात मुस्लिम बहुल भागात रामदास कदम व शिवसेनेचे बॅनर लागले होते. या मागे तत्कालीन आमदार इम्तियाज जलील यांचाच पुढाकार होता अशी चर्चा होती.

तेव्हापासून कदम-जलील यांच्यात मैत्री झाल्याच्या चर्चा आहेत. जिल्हा नियोजन समितीच्याबैठकीत देखील कदमांनी जलील यांच्या मतदारसंघातील कामासाठी भरघोस निधी देत दोस्ती निभावल्याचे पुढे दिसून आले होते तर इम्तियाज जलील यांच्या खासदार चषक कार्यक्रमात कल्याणचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती, यानंतर दोघांनीही एकमेकांवर स्तुती सुमने उधळली होती यामुळे जलील यांची सर्व पक्षात आपले मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत.
माझे पहिले टार्गेट हे 2024 च्या निवडणुकीत पुन्हा इम्तियाज जलील यांना लोकसभेत पाठविण्याचे आहे. शहराचा विकास करणे आणि मुंबई, पुण्यात गेलेल्या तरुणांना पुन्हा शहरात यावे असे वाटले पाहिजे, शहराचा विकास व्हावा हे ध्येय असल्याचे सांगतानाच लोकांची मदत करण्याचा प्रयत्न आहे. कट्टरपंथी विचार न करता शहराचा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगतानाच निवडणूक लढवणार की नाही हे अजून ठरले नाही, केवळ पक्षात काम करत स्वत:ची ओळख तयार करतोय, असे बिलाल जलील यांनी म्हटले आहे.