ठाणे, (जिमाका) : सातत्याने लोकांमध्ये राहणारा व लोकोपयोगी कामे करणारा नेता म्हणून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पाहिले जाते. जलजीवन बरोबरच केंद्र सरकारच्या इतर सर्व योजना त्यांनी चांगल्या प्रकारे राबविल्या. मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे ही तळमळ घेऊन ते काम करत आहेत. त्यामुळे लोकांचे त्यांना प्रेम मिळत आहे. त्यांची वाटचाल ही नेते पदापासून लोकनेते पदाकडे चालली आहे. लोकनेता कोणाला होता येत नाही कारण जनता लोकनेता करत असते, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी मधील दिवे अंजुर येथे आयोजित केंद्रीय राज्यमंत्री पंचायतराज चषक क्रिकेट स्पर्धेच्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार गीता जैन, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, सुनील भुसार, पांडुरंग बरोरा, माजी आमदार रविंद्र फाटक, दशरथ टिव्हरे, शीतल तोंडलीकर, प्रेमनाथ म्हात्रे, सिद्धेश पाटील, वरूण पाटील, रवी पाटील, देवेश पाटील, तरुण राठी आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी क्रिकेट मैदानावर जाऊन जोरदार बॅटिंग केली. केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील यांनी बॉलिंग केली. यावेळी दोन फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले.
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या दीर्घायुष्य व आरोग्यदायी शुभेच्छा देऊन श्री. फडणवीस म्हणाले की, जन्मदिनाचे औचित्य साधून वेगवेगळे सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. दुर्गम आदिवासी भागात सुविधा पोचविण्याचे काम कपिल पाटील करतात. त्याचप्रमाणे खेळ महोत्सवाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना चांगला मंच उपलब्ध करून देतात. भिवंडी लोकसभा मतदार संघ, कल्याण पश्चिम या भागात कपिल पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. उड्डाण पूल, नदी, खाडीवरचे पूल, काँक्रीटचे रस्त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील यांनी पुढाकार घेतला.