एक मार्चपासून अंबुलगा कारखाना देणार प्रतिटन ऊसाला आडीच हजार भाव
हा कारखाना सुरू झाल्याने जिल्ह्यातील कारखानदारांची मक्तेदारी संपुष्टात
माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची माहिती
निलंगा : आंबुलगा कारखाना सुरू झाल्याने यंदा वेळेत शेतकऱ्यांचा ऊसाचे गाळप झाले. शेतकरी कारखानदारांच्या दारात नव्हे तर कारखानदार शेतकऱ्यांच्या दारात येण्याचे दिवस येणार आहेत असे सांगून आंबुलगा कारखाना सुरू झाल्याने जिल्ह्याती मातब्बर कारखानदारांची मक्तेदारी संपुष्टात आली असल्याचा आरोप माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला. शिवाय यंदाच्या गळीत हंगामात एक मार्चपासुन गाळपासाठी येणा-या प्रतिटन ऊसाला आडीच हजार रूपये भाव याप्रमाणे पहिला हप्ता शेतक-यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज, ओंकार साखर कारखाना प्रा.लि, युनिट नं ०२ या कारखान्याकडे एक मार्च पासुन गळीतास येणा-या ऊसास प्रति टन २५००/- प्रमाणे पहिला हप्ता शेतक-यांना देणार आहे. तसेच ३१ मार्च पर्यंत कारखाना गाळप चालू राहणार असून निलंगा मतदार संघातील शेतकऱ्यांचे गाळप पूर्ण झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही. शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस स्वतः मालक तोड करून कारखान्याकडे ऊस गळीतास पाठवावा असे आवाहनही यावेळी केले आहे. जिल्ह्यात अनेक मात्तबर नेत्यांचे कारखाने असून गेल्यावर्षी गाळपा अभावी शेतकऱ्यांचा ऊस फडात उभा राहिला होता असा आरोप करून १८ महिणे झाले असताना देखील ऊसाचे गाळप जिल्ह्यातील मात्तबर कारखानदार करत नव्हते. ऊभा ऊस पाहून शेतकरीही मेटाकुटीला आले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत असल्याने मी याबाबत राज्याच्या विधानसभेत आवाज उठवला होता. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देत खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून वेळेत ऊस घेऊन जाण्यास कारखानदाराला भाग पाडले होते. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील सगळ्याच कारखानदाराचे धाबे दणानले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल पाहून गेल्या १२ वर्षापासून बंद असलेला अंबुलगा कारखाना चालू करण्याचा निर्णय घेतला व तात्काळ चालू करून निलंगा विधानसभा मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला. आगामी काळात निलंगा विधानसभा मतदार संघात ऊसाचे क्षेत्र कमालीचे वाढणार असून शेतकऱ्यांच्या हक्काचा व विस्वासाचा अंबुलगा कारखाना चालू झाल्याने मतदार संघातील निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी औसा या भागातील शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.
म्हणूनच यंदा वेळेत शेतकऱ्यांचा ऊस जात आहे. एकही गाडी जिल्ह्याबाहेर गेली नाही. आंबुलगा व किल्लारी कारखाना सुरू झाल्याने कारखानदारामध्ये स्पर्धा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. कारखानदारांची मक्तेदारी यामुळे संपुष्टात येणार आहे. २८ फेब्रुवारी पर्यंतचे सर्व शेतकऱ्यांचे देयक आदा झाले असून भविष्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊसाला तात्काळ व ठरलेल्या भावाप्रमाणे भाव अंबुलगा कारखाना देणार आहे. असे श्री. निलंगेकर व चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यानी सांगितले.