सिद्धेश्वर यात्रेत रविवारी रंगणार कुस्त्यांचा फड विजेत्या मल्लास मिळणार चांदीची गदा
लातूर/ प्रतिनिधी:ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवानिमित्त रविवार दि.५ मार्च रोजी कुस्त्यांचा फड रंगणार आहे.या स्पर्धेतील विजेत्यास देवस्थानच्या वतीने लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने घेतली जाणारी कुस्ती स्पर्धा राज्यात प्रसिद्ध आहे.राज्यातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभाग नोंदवतात.विजेत्यांना देवस्थान तसेच शहरातील संस्था आणि नागरिकांच्या वतीने बक्षिसे दिली जातात.
रविवारी दुपारी १ वाजता या स्पर्धेस प्रारंभ होणार आहे.
स्पर्धेतील अंतिम कुस्ती जिंकून सिद्धेश्वर केसरी ठरणाऱ्या विजेत्या मल्लास श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.लातूर महानगरपालिकेच्या वतीनेही लातूर केसरी हा पुरस्कार व ५१ तोळे चांदीचे कडे,मानाचा फेटा व हार दिला जाणार आहे.अमर कोकाटे यांच्या वतीने स्व. सुधाकरराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ श्री रत्नेश्वर केसरी केसरी हा पुरस्कार व चांदीचे कडे देऊन मल्लाचा सन्मान करण्यात येणार आहे.स्व. ज्ञानोबा गोपे यांच्या स्मरणार्थ चांदीचे कडे दिले जाणार आहे.यासह शहरातील व्यापारी आणि भक्तांच्या वतीनेही असंख्य बक्षिसे दिली जाणार आहेत.
कुस्ती स्पर्धेच्या सर्व नियमांचे पालन करून ही स्पर्धा दरवर्षी होते.त्यामुळे या स्पर्धेचा राज्यभर लौकिक आहे.यावर्षी होणाऱ्या स्पर्धेत लातूर जिल्ह्यासह राज्यातील मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रा समितीच्या वतीने प्रशासक तथा निरीक्षक सचिन जांबुतकर,विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे,अशोक भोसले,सुरेश गोजमगुंडे, ओम गोपे, विशाल झांबरे, आशिष क्षीरसागर यांच्यासह विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.
https://jantaexpress.co.in/?p=4554