विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे
शनिवारीपासून स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान
लातूर, दि.02 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत 4 मार्च 2023 पासून स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे राज्यस्तरीय उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
या अभियानांतर्गत लातूर शहरातील शासकीय व खाजगी अशा एकूण पाच शाळांमध्ये इयत्ता सातवी ते नववीमधील विद्यार्थ्यांची बी.एम.आय. चाचणी, समुपदेशन व उपचार करण्यात येणार आहेत. पुढील वर्षभर हे अभियान चालू राहणार असून त्याअंतर्गत वेगवेगळ्या शाळांमध्ये समुपदेशन, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, पोस्टर सादरीकरण अशा विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
अधिष्ठाता डॉ. समिर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अजित नागांवकर, डॉ. व्यंकटरमण सोनकर, नोडल अधिकारी डॉ. नम्रता आचार्य, डॉ. ललिता चिंते, डॉ. बालाजी उकरंडे, डॉ. वैशाली बहात्तरे, श्री.चव्हाण, श्रीमती पाटील, श्री.कांबळे, श्री. सुर्यवंशी व श्री. मुंडे हे सर्व समाजसेवा अधिक्षक, पदव्युत्तर विद्यार्थी व नर्सिंग विद्यार्थ्यांचा या अभियानात सहभाग राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.