निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयाचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे.
निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा?
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आता पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि CJI संयुक्तपणे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची निवड करतील. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा, असा आजचा काळ आहे. अशा स्थितीत हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.
मनमानीपणाला चाप बसणार
उद्धव ठाकरे म्हणाले, पक्षांतर्गत लोकशाहीदेखील जिवंत राहीली पाहीजे. ही लोकशाही जिवंत ठेवणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या नियुक्त्या होत असल्याने पक्षपाती निर्णय होताना आपण पाहतो. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे आता याला काही अंशी चाप बसणार आहे.
भ्रमातून देशही बाहेर पडेल
आज कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत 28 वर्षांपासूनची भाजपची सत्ता उलथवून लावली. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, कसबामधील नागरिक भ्रमातून बाहेर आले आहेत. भाजपने निव्वळ खोठी आश्वासने व खोटा प्रचार करुन येथे आपली सत्ता अबाधित ठेवली होती. आता हळूहळू देशही या भ्रमातून बाहेर येईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला
भाजपविरोधी मतांमध्ये वाढ
उद्धव ठाकरे म्हणाले, वापरा आणि फेका ही भाजपची निती आहे, शिवसेनेबाबत भाजपने तेच केले. कसब्यातही टिळकांच्या कुटुंबाचा वापर केला. गिरीश बापट यांना तब्येत ठिक नसतानाही त्यांना प्रचारात आणले. गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्याबाबतही भाजपने तेच केले. चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार आघाडीवर असल्या तरी भाजपाच्या विरोधातील मत वाढताहेत. राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या मतांची बेरीज केली तर ती भाजपापेक्षा जास्त आहे. त्यामुळे देशात आता भाजपविरोधात जनमत निर्माण होत आहे, असे म्हणता येईल.
संबंधित वृत्त