• Tue. Apr 29th, 2025

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मुलाचं थेट राष्ट्रपतींना पत्र

Byjantaadmin

Mar 1, 2023
draupadi murmu

शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा निम्मीही किंमत मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी उभ्या पिकामध्ये रोटर फिरवत आहेत. शेतात कोणत्याही पिकाचं उत्पादन घ्यायचं असेल तर प्रचंड पैसा खर्च करावा लागत आहे, पण त्यातून मुबलक आर्थिक उत्पन्न मिळत नाही. अलीकडेच एक शेतकरी बाजारात कांदा विकण्यासाठी गेला असता त्याला ५०० ते ६०० किलो कांद्यासाठी केवळ दोन रुपयांचा धनादेश देण्यात आला.

ही परिस्थिती केवळ कांदा उत्पादकांचीच नाही तर कोबी, फ्लॉवर, केळी यांसारखी पीके घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची आहे. उत्पादनाला दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी थेट पिकात रोटर फिरवत आहेत. आता उभ्या पिकांवर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या, अशी मागणी महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे. यासाठी त्याने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे. शुभम गुलाबराव वाघ असं या तरुणाचं नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवाशी आहे.

शेतकऱ्याच्या मुलाने राष्ट्रपतींना पाठवलेलं पत्र जसेच्या तसे…

महोदया,
आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने उभ्या पिकात रोटर फिरवावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजारात चेष्टा केल्याप्रमाणे ५०० ते ६०० किलो कांदा विकून फक्त दोन रुपयांची पट्टी हातात मिळतेय. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कोबी, फ्लॉवर, कांदा आणि मोठा खर्च करून केलेली केळीच्या बागेतही रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

एकीकडे महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. पण खर्चाच्या निम्म्या रकमे इतकाही नफा शेतकऱ्यांना मिळत नाहीये. तसेच शेतमाल निर्यात होत नसल्याने बाजारात आवक वाढतेय. त्यामुळे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला कवडीचाही दर मिळत नाहीये. आता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय. कुठलंही पीक घेतलं तरी तिचं अवस्था आहे. पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का? म्हणूनच माय-बाप सरकार तुम्हीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

शेतात साधा रोटर फिरवायचा म्हटलं तरी २००० ते २५०० रुपये खर्च येतो. जिथे मोठ्या आशेने लावलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्या पिकात आज शेतकरी रोटर फिरवत आहे. जिथं शेतमालचं विकला नाही, तर तिथं शेतकऱ्याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागतेय. शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही.

आज शेतकऱ्यांना दोन रुपये एवढी कांद्याची पट्टी मिळतेय, पण तोच कांदा बाजारात सर्वसामन्यांना २० रुपये किलोने विकला जातोय. मग शेतकऱ्यांची कोंडी आणि कोणाची चांदी होतेय? शेतकरी राजाने फक्त काबाड कष्टच करायचं का? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण आज या पोशिंद्यावरच काय वेळ आली आहे. आधीच लेकरांच्या तोंडाचा घास घेऊन उसनवारी करून पीक जोमात आणले. पण आता त्यालाच कवडीचा दर मिळतोय. म्हणूनच निदान भाव नसलेल्या पिकात रोटर फिरवण्यासाठी जगाच्या पोशिंद्याला किमान प्रति एकर दोन हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, ही कळकळीची विनंती आहे.

1 मार्चपासून बदलणार नियम! तुमच्या खिशावरही होईल परिणाम, अवश्य घ्या जाणून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed