पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील तीन आरोपींमध्ये तरनतारन येथील गोइंदवाल साहिब कारागृहात हाणामारी झाली आहे. या घटनेत दोन आरोपींचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. मनदीप तुफान आणि मनमोहन सिंग, अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर केशव नावाचा एक आरोपी या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचापाकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली
पंजाब पोलिसांतील वरिष्ठ अधिकारी डीएसपी जसपाल सिंह ढिल्लन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी मनदीप सिंग तुफान, मनमोहन आणि केशव यांच्यात वाद झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. तिघांनी एकमेकांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत तिघेही कैदी गंभीर जखमी झाले. त्यानंतर तिघांनाही कारागृह प्रशासनाने तत्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच मनदीप आणि मनमोहन यांचा मृत्यू झाला. तर केशव गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत