• Wed. Apr 30th, 2025

भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटले:कसबा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप, निषेधार्थ उपोषण सुरू

Byjantaadmin

Feb 25, 2023

भारतीय जनता पक्षाने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप कॉँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी कसबा गणपतीसमोर धंगेकर आज सकाळी 11 वाजता उपोषणाला बसले आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे इतर कार्यकर्तेही उपस्थित आहेत.

लोकशाहीची हत्या

भारतीय जनता पक्षाने काल पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. कसबा मतदार संघातील रविवार पेठ, गंज पेठ या सारख्या आदी भागात भाजपने पैशांचे वाटप सुरू केले असून या संपूर्ण प्रकारात पोलिस देखील सहभागी असल्याचे धंगेकर यांनी आरोप केले आहेत. यामुळे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी कसबा गणपती मंदीरासमोर उपोषणाला धंगेकरांनी सुरुवात केली आहे. या निवडणुकीत ”लोकशाहीची हत्या झाली आहे, त्यामुळे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका धंगेकर यांनी घेतली आहे.

कसब्यात तगडी लढत
कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळं कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत पहायला मिळत आहे.

कसब्यात पैसेवाटप

कसब्यात भाजप विरूद्ध काँग्रेस असा थेट सामना होत आहे. भाजपकडून संपूर्ण मंत्रिमंडळ प्रचारासाठी आणले जात आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत.

कसब्यात होणारा पैसेवाटप राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात भाजपकडून मोठ्याप्रमाणावर पैसे वाटण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. परंतु, आता रवींद्र धंगेकर यांनी थेट उपोषणाला बसण्याचा निर्णय घेऊन ही लढाई आणखी तीव्र केली आहे. निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यावर काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed