• Wed. Apr 30th, 2025

फक्त औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे नाही: केंद्र सरकारची NOC

Byjantaadmin

Feb 25, 2023

फक्त औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे नाही: केंद्र सरकारची एन ओ सी

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करण्यात आले असून राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आता औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्यात आले आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली. तसेच त्यांनी केंद्र सरकारच्या मंजुरीचे पत्रही ट्विट केले आहे.

 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेला औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत शिंदे सरकारने पुन्हा आपल्या कॅबिनेटमध्ये शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला. राज्य सरकारने या दोन शहरांचा नामांतराचा निर्णय घेतला व हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला. त्यानंतर काही महिन्यातच या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या मंजुरीबाबत एक ट्विट केले. त्यात त्यांंनी करुन दाखवले असे म्हटले आहे. ”औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!”

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे आता अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे करण्यासंबंधी केंद्र शासनाने एनओसी दिलेली आहे.

केंद्र सरकार कडून देण्यात आलेल्या या एनओसी मध्ये राज्य सरकारला असे कळविण्यात आले आहे की तुम्ही 20 ऑक्टोबर 2022 रोजी भारत सरकारकडे पाठवलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर असे करण्यात यावे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव असे करण्यात यावे या मागणी पत्राला अनुसरून या शहरांच्या नावात बदल करण्यात आमची कुठलीही हरकत नाही. असे नमूद करण्यात आलेले आहे.

या पत्रातील मजकुरानुसार हे स्पष्ट होते आहे की नामांतराचा निर्णय हा केवळ औरंगाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचे शहर असलेल्या औरंगाबादच्या नावातच छत्रपती संभाजी नगर असे करण्यास एनओसी देण्यात आलेली आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचे शहर असलेल्या शहराचे नामांतर धाराशिव करण्यास एनओसी देण्यात आलेली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याला औरंगाबाद तसेच उस्मानाबाद जिल्ह्याला उस्मानाबाद जिल्हा असेच संबोधण्यात येणार आहे. त्यामुळे या आदेशातील ही बाब समजून घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed