दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.मात्र, भाजपसमोर तगडे आव्हान महाविकास आघाडीने उभे केले आहे. दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री तातडीची बैठक घेतली. शिंदे संभाजीनगरहून मध्यरात्री 2 वाजता कसबा मतदारसंघात पोहोचले. त्यावेळी त्यांनी पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली आणि बैठक घेतली. भरत गोगावले, नरेश म्हस्केंसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यात कसबा पोटनिडणुकीच प्रचार हे शिगेला पोहचलं असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा केल्याने भाजप उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का मानला जात आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीने विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपचे मोठे नेते यांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. पुणे कसबा आणि चिंचवड येथील दोन्ही जागा या भाजपच्या असल्याने त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण हे असून दोन वर्षांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे आहे. तर उत्सव प्रमुख प्रमुख अक्षय गोडसे हे आहे. अशातच उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिल्याने गणेश मंडळामध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.
अक्षय गोडसे हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे माजी अध्यक्ष कै.अशोक गोडसे यांचे पुत्र असून तात्या गोडसे हे अक्षय याचे आजोबा आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट च्या उभारणीत गोडसे परिवारच एक मोठे योगदान असून अक्षय यांच्या या पाठिंब्याने गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये आत्ता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
कलाटेंच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात
चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होत आहे.अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले आहेत. आंबेडकरांनी कलाटेंसाठी काल सभा घेतली…या सभेला मोठी गर्दी झाली होती. भाजप महायुतीच्या अश्विनी जगताप, मविआचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार कलाटे यांच्यात अटीतटीची लढाई होणार आहे. यात कोण बाजी मारणार हे दोन मार्च रोजी निश्चित होणार आहे. मात्र, चिंचवडमध्ये आंबेडकरांच्या सभेला गर्दी झाल्यानं कलाटेंची बाजू अधिक बळकट होताना दिसत आहे. यावेळी सभेतून आंबेडकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात
दरम्यान, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. आज चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कसबापेठ मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे. चिंचवड मतदारसंघात आमदार रोहित पवार, निलेश लंके, आदिती तटकरे नाना काटेंसाठी प्रचार करणार आहेत. तर चित्रा वाघ आज अश्विनी जगताप यांच्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
‘अंतर्गत वाद आणि गटबाजीचा फटका’
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेनं पुणे जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केलीय. अंतर्गत वाद आणि गटबाजीचा फटका बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेला बसला आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष साठे आणि महिला जिल्हा अध्यक्ष पूनम तावरे यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रहारला पुण्यात गळती चालू आहे. आता कार्यकारिणी बरखास्त झाल्याने पदाधिकारी नाराज झालेयत…काही पदाधिकारी पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. यामुळे पुण्यात प्रहार संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.