कायम इलेक्शन मोडवर राहणाऱ्या भाजपने आता २०२४ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजपचे मुख्य लक्ष्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल. म्हणजेच, पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंतचे विद्यमान प्रतिनिधी सोशल मीडिया प्लॅटफार्मवर किती सक्रिय आहेत, यावर त्यांची पुढील उमेदवारी निश्चित होईल. या दृष्टीने भाजपने सरपंचापासून आमदारापर्यंत सोशल मीडिया ऑडिट सुरू केले आहे. या ऑडिटनुसार विद्यमान १३% आमदार सोशल मीडियावर पूर्णपणे निष्क्रिय आहेत, तर ९७% आमदारांचे फाॅलोअर्स २५ हजारांपेक्षा कमी असल्याने त्यांचे तिकीट धोक्यात असल्याची माहिती आहे. मात्र ९७% मधील ५०% आमदारांचे फाॅलोअर्स तीन महिन्यांत २५ हजारांच्या वर आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आमदार-खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार
१०४ आमदार, २५ खासदारांसह सुमारे २८०० लोकप्रतिनिधींचे रिपोर्ट कार्ड पक्षाने तयार केले
104 पैकी 13% आमदार सोशल मीडियावर पूर्ण निष्क्रिय, तर 97% आमदारांचे फॉलोअर्स 25 हजारांच्या आत आहेत.
70% खासदार सोशल मीडियावर सक्रिय
२५ हजारांपेक्षा कमी फाॅलोअर्स असलेल्या आमदारांमध्ये ग्रामीण भागातील आमदार जास्त आहेत. त्यांची लोकांशी नाळ असली तरी सोशल मीडियाच्या बाबतीत ते अजूनही मागे आहेत.
सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत
२०२४च्या निवडणुकीत सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने ही योजना आखली आहे. बहुतांश चौकीदार व पहारेकरी सोशल मीडियावर कायम काहीतरी पाहत असतात. एखाद्याने एका विषयाची पोस्ट पाहिली की त्याच प्रकारच्या पोस्ट त्याला येत राहतात. याचा आधार भाजप घेईल. लोकप्रतिनिधींपासून भाजपच्या सोशल मीडिया हँडलपर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी भाजपचे १९ हजार शुभचिंतक सोशल मीडिया वाॅरियर म्हणून पक्षाशी जोडले जातील. त्यांच्या मदतीने हे आव्हान पेलण्याचे उद्दिष्ट आहे.
अडीच लाख ग्रुप जोडणार
लोकप्रिय सोशल मीडियाचे अडीच लाख ग्रुप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी जोडणार. ७ मिनिटांत चांदा ते बांद्यापर्यंत मेसेज फॉरवर्ड होतील, अशी व्यवस्था.
18 वर्षांच्या मतदारावर भर
आज १८ वर्षांच्या मतदाराने फक्त मोदींचे राज्य पाहिले आहे. काँग्रेसचा सत्ताकाळ त्यांना माहिती नाही. हा वर्ग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याने उपयोग करून घेणार.
२५ हजार फॉलाेअर्सचा नेमका काय आहे फंडा?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये बोलताना तिकीट वाटपात सोशल मीडियातील फॉलोअर्सच्या शक्तीचा विचार केला जाणार असल्याचे संकेत दिले होते. त्यात सरपंचांपासून आमदारांपर्यंत तिकीट वाटपात २५ हजार फॉलोअर्सचा निकष असल्याचा संदर्भ आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य घराघरात पोहोचवण्यासाठी…
देवेंद्र फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य घराघरात पोहोचवायचे आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ध्येयपूर्तीसाठी परिश्रम घेत आहेत. त्यासाठी बूथ पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. येत्या आठ महिन्यांत ९५ हजार बूथवरील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
– श्वेता शालिनी, सोशल मीडिया प्रमुख, भाजप, महाराष्ट्र.