तथाकथित गोरक्षकांच्या झुंडशाहीच्या जोरावर स्वतःच्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजून घ्यायच्या आणि गोव्यापासून ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत मात्र गोमांसाची विक्री ‘सरकारी इतमामात’ करायची, हेच भाजपचे बेगडी हिंदूत्व आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनात आज म्हटले आहे की, जिथे भाजप सत्तेत नाही तेथे गोमाता, गोमांस यावरून भाजपवाले पेटवापेटवी करतात. भाजपशासित राज्यांत मात्र गोमांस धोरणावर मौन बाळगले जाते. भाजपचे हिंदुत्वदेखील बेगडी आणि गायप्रेमही ढोंगी. याच ढोंगाचा बुरखा त्यांचेच मेघालय प्रदेशाध्यक्ष एर्नेम्ट मावरी यांनी आता पुन्हा फाडला.
मावरी यांनी पंचाईत केली
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष, संघ परिवार हे गाय आणि गोमांस याबाबत कायमच दक्ष असतात. विशेषतः गोमांस भक्षणाबाबत ही मंडळी अटीतटीवरच असते. ‘मी गोमांस खातो’ किंवा ‘गोमांस खाण्यात गैर काय?’ असे कोणी बोलायचाच अवकाश, ही मंडळी त्याच्यावर तुटून पडलीच पाहिजेत. मात्र आता भाजपचे मेघालयचे प्रदेशाध्यक्ष एर्नेस्ट मावरी यांनीच आपल्याच पक्षाची पुरती पंचाईत केली. मावरी यांनी अत्यंत उघडपणे ‘आपण गोमांस खातो, ती आमची संस्कृती आहे आणि माझ्या पक्षाला यावर कोणताही आक्षेप नाही,’ असे म्हटले आहे.
हिंदुत्वाचा रंग राजकीय गरजेनुसार
अग्रलेखात म्हटले आहे की, गोमांस खाणे समर्थनीय आहे की नाही, हा येथे मुद्दा नाही. प्रश्न आहे तो भाजप आणि परिवाराच्या दुटप्पीपणाचा. मुद्दा गोमांस भक्षणाचा असो की हिंदुत्वाचा, या मंडळींची भूमिका कायम दुटप्पीच राहिली आहे. भाजपच्या हिंदुत्वाचा रंग तर त्यांच्या राजकीय गरजेनुसार बदलत असतो. म्हणजे इतरांनी काही वेगळी राजकीय भूमिका घेतली तर यांचा तिळपापड होतो, पण स्वतः काही करतात तेव्हा त्याला ‘राष्ट्रीय गरज’ वगैरे तात्त्विक मुलामा दिला जातो. मेहबुबा मुफ्तींसारख्या फुटीरतावादी आणि हिंदुत्वाच्या उघड विरोधक असलेल्या बाईच्या पक्षासोबत जम्मू-कश्मीरसारख्या संवेदनशील राज्यात भाजप सत्तेत बसू शकतो. तेव्हा त्यांचे हिंदुत्व संकटात येत नसते.
भाजपशासित राज्यांतील गोमांस धोरणावर मौन
अग्रलेखात म्हटले आहे की, जे हिंदुत्वाबाबत तेच गोमांस खाण्याच्या वादाबाबत. एकीकडे गोरक्षण, गोमांस भक्षण यावरून ही मंडळी मुठी आवळून आरडाओरडा करीत असते. आम्हीच कसे गोसंरक्षक असा बोभाटा करीत इतरांना चार गोष्टी सुनावत असते. मात्र जेव्हा गोवा, मेघालय किंवा ईशान्येकडील भाजपशासित राज्यांतील गोमांस धोरणाचा विषय येतो तेव्हा ती ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून गप्प बसते. नाही म्हणायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी याच महिन्यात गोमांसाबाबत एक ‘धाडसी’ विधान केले होते. ‘ज्यांना नाइलाजास्तव गोमांस खावे लागले आहे, त्या लोकांसाठी आम्ही आमचे दरवाजे बंद करू शकत नाही,’ असे होसबळे यांनी स्पष्ट केले होते. भाजपचे मेघालय प्रदेशाध्यक्ष एर्नेस्ट मावरी यांनी आता त्याच्याही पुढे एक पाऊल टाकले आहे.
दोन तरुणांना जाळून मारले
अग्रलेखात म्हटले आहे की, मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात ‘बीफ’वरून देशभरात जे ‘झुंडबळी’ गेले ते भाजपच्या याच दुटप्पी गोप्रेमाचे बळी होते. आताही हरयाणात गोतस्करीच्या संशयावरून दोन मुस्लिम तरुणांना जाळून मारण्यात आल्याचे प्रकरण गाजतेच आहे. मूळचे राजस्थानातील असलेल्या या तरुणांचे राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून गोतस्करीचा आरोप करीत काहींनी अपहरण केले. त्यांना प्रचंड मारहाण केली आणि नंतर दोघांनाही जिवंत जाळले असा आरोप आहे. आरोपी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असल्याचाही आरोप केला जात आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत स्वयंघोषित ‘गोरक्षकां’चे असे ‘झुंडबळी’ नवीन नाहीत. अशा तथाकथित गोरक्षकांच्या झुंडींना संरक्षण द्यायचे, त्यांच्या झुंडशाहीच्या जोरावर स्वतःच्या राजकीय स्वार्थाच्या पोळय़ा भाजून घ्यायच्या, हेच भाजपचे राजकारण.
मोदी पर्वातही टनावारी बीफ निर्यात
अग्रलेखात म्हटले आहे की, मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातही देशातून होणारी टनावारी बीफची निर्यात थांबलेली नाही. कारण कोटय़वधींच्या परकीय चलनाच्या प्रेमात या सरकारचे गायप्रेम वाहून गेले आहे. कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईंच्या हंबरडय़ाकडे दुर्लक्ष करून हे सगळे सुरू आहे. भाजपचे हिंदुत्वदेखील बेगडी आणि गायप्रेमही ढोंगी. याच ढोंगाचा बुरखा त्यांचेच मेघालय प्रदेशाध्यक्ष एर्नेस्ट मावरी यांनी आता पुन्हा फाडला इतकेच!