• Fri. Aug 8th, 2025

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बाह्यरुग्ण विभागाचे अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या इमारतीमध्ये स्थानांतर

Byjantaadmin

Feb 20, 2023

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बाह्यरुग्ण विभागाचे अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या इमारतीमध्ये स्थानांतर

लातूर,  (जिमाका): विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जुनी बाहयरुग्ण विभागाची इमारत पाडून त्याजागी नवीन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम होईपर्यंत संपूर्ण बाह्यरुग्ण विभाग मंगळवार (दि.21) पासून अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या तळमजला व पहिल्या मजल्यावर सुरु करण्यात येणार आहे.

अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या तळमजल्यावर शल्यचिकित्साशास्त्र विभाग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग, हृदयरोग विभाग, नेत्र विभाग, मानसोपचारशास्त्र विभाग, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग, क्ष-किरणशास्त्र विभाग व शरीरविकृतीशास्त्र विभागाच्या रक्त तपासणी हे विभाग कार्यरत असतील. तसेच औषधवैद्यकशास्त्र विभाग, क्षयरोग व उररोग विभाग, दंतरोग विभाग, त्वचा व गुप्तरोग विभाग, कान, नाक, घसाशास्त्र विभाग, बालरोग विभाग हे विभाग पहिल्या मजल्यावर कार्यरत असतील.

अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या इमारतीमधील मुख्य रुग्णालय तसेच गांधी चौक – मेन रोड या दोन्ही बाजूंकडून नवीन बाह्यरुग्ण विभागास जाण्याकरिता प्रवेश असेल. तसेच वाहनतळाची व्यवस्था मुख्य रुग्णालय व अतिविशेषोपचार रुग्णालय या दोहोंच्या मधील मोकळ्या जागेमध्ये असेल, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *