मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बॅनर लावून सभा घेण्यात आल्या. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर आम्हाला धोका दिला गेला. त्यामुळे धोका देणाऱ्यांना कधी माफ केले नाही पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन त्यांची हिंमत वाढते. आम्ही विचारांशी बांधील असून सत्तेसाठी वडिलांच्या, पक्षाच्या विचारांना धोका देऊन सत्तेत आलो नाही. निवडणूक आयोगाने ‘दूध का दूध आैर पानी का पानी’ त्यांच्या निकालातून दाखवून दिले आहे. ‘सत्यमेव जयते’चे खरे मूल्य निवडणूक आयोगाने दाखवले, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
तसेच आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व जागा या भाजप-शिवसेनेला मिळतील आणि इतर कोणत्याही पक्षाला एकही जागा जाणार नाही. यादृष्टीने परिश्रमपूर्वक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी पुण्यात शनिवारी केले. ते ‘मोदी @ २०’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते.
शहा म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निकालाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षास शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाले, हा युतीचा मोठा विजय आहे. जे लोक खोट्याच्या आधारावर प्रचार करतात, त्यांना आता समजेल नेमके सत्य काय आहे. विरोधी पक्षाच्या पायाशी लोटांगण घालणाऱ्यांना समजेल विचारांशी बांधिलकी तोडल्यानंतर काय होते.