उस्मानाबाद, : शुक्रवारी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. यावरून पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र दुसरीकडे एक वेगळचं चित्र पहायला मिळाल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या.
शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत आणि ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पहायला मिळालं. यावेळी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांना जवळ बोलवून त्यांचा हात उंचावल्यानं राजकीय वर्तृळात चर्चाला सुरूवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे.
चर्चेला उधाण
शिवजयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत आणि ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यावेळी तानाजी सावंत यांनी ओमराजे आणि कैलास पाटील यांना जवळ बोलावून त्यांचा हात उंचवला. या प्रकारामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. तानाजी सावंत हे शिंदे गटात गेल्यानंतर ओमराजे निंबळकर आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची दरार निर्माण झाली होती. मात्र तानाजी सावंत यांच्या या कृतीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
तानाजी सावंत यांचं स्पष्टीकरण
दरम्यान याची राजकीय वर्तृळात चर्चा सुरू झाल्यानंतर तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण देत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आम्ही सर्व राजकीय मतभेद विसरून सहभागी झालो आहोत. या भेटीचा राजकीय अर्थ काढणं चुकीचं असल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.