देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांविषयी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोठे विधान केले आहे. ‘भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेसने समोर येऊन विनाविलंब विरोधकांची मोट बांधली पाहिजे. सर्वजण एकजूट झाले तर भाजपला 100 च्या आत रोखता येईल यात कोणताही शंकता नाही,’ असे ते म्हणालेत.
दुसरीकडे, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी नितीश कुमार यांच्या विधानावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ‘नितीशकुमार जो विचार करत आहेत, तोच विचार काँग्रेसच्याही मनात आहे. पण प्रथम आय लव्ह यू कोण म्हणणार हा प्रश्न आहे. मी तुमचा संदेश पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवेल. मी एक वकील असून, तुमच्यातर्फे युक्तिवाद करेल,’ असे ते म्हणालेत.
पाटण्यात आयोजित CPI-ML च्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना सीएम नितीश कुमार म्हणाले की, पंतप्रधान पदाच्या मुद्यावर माझी कोणतीही वैयक्तिक इच्छा नाही. आम्हाला केवळ बदल हवा आहे. सर्वजण ठरवतील ते मला मान्य असेल. पण आता काँग्रेनसे पुढे येऊन निर्णय करावा. विरोधकांना एकजूट करण्यात आला उशीर होता कामा नये.
विरोधक एकत्र आले तर भाजपला 100 जागाही मिळणार नाहीत
नितीश कुमार यावेळी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांना उद्देशून म्हणाले की, मी दिल्लीत जाऊन सोनिया व राहुल गांधींची भेट घेतली. त्यानंतर आता तुमच्या माध्यमातून काँग्रेस नेतृत्वाला आवाहन विरोधकांची एकजूट करण्याचे आवाहन करत आहे. विरोधक एकजूट झाले तर भाजपला 100 च्या आत रोखता येईल. यात कोणतीही शंका नाही. बिहारमध्ये विरोधक एकजूट होऊन काम करत आहेत.
मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, एनडीएतून बाहेर पडल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आमचे स्वागत केले. 2024 मध्ये सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर भाजपचा सफाया होईल. आज स्वातंत्र्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सर्वच जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन वाटचाल करावी लागेल.
काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हिंग सीटची जागा द्यावी – तेजस्वी
यावेळी राजद नेते तेजस्वी यादव यांनीही यावेळी काँग्रेसला विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हिंग सीटवर बसण्याची संधी द्यावी. ज्या ठिकाणी भाजपशी थेट सामना आहे, तिथे काँग्रेसने टक्कर द्यावी. काँग्रेसने आता अधिक विलंब करता कामा नये, असे ते म्हणाले.