उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कलानगर येथे ओपन जिपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हाही त्यांनी सुरुवातीच्या दिवसांमद्ये गाडीच्या टपावरुन भाषण केले होते. अगदी त्याच पद्धतीने संवाद साधत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शिंदे गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य निवडणूक आयुक्तांवरही जोरदार प्रहार केले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे
- गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. चोरांना धडा शिकवणारच.
- ज्यांनी शिवसेनेकडून नाव, धनुष्यबाण चोरलंय, त्यांनी माहिती नाही की, त्यांनी मधमाशीच्या पोळ्यावर हात मारलाय. या मधमाशीचा चावा काय असतो, हे लवकरच त्यांना कळेल.
- सरकारी यंत्रणा भाजपच्या गुलाम झाल्या आहेत. निवडणूक आयुक्तही गुलाम झाले आहेत. गुलाम झालेल्या यंत्रणा अंगावर सोडून शिवसेना संपवणे शक्य होणार नाही.
- निवडणूक आयुक्त निवृत्त झाल्यावर राज्यपाल होऊ शकतील. असे गुलाम भाजपने पाळलेत. मात्र, माझे या गुलामाला आव्हान आहे, ते शिवसेना कुणाची?, हे ठरवू शकत नाहीत.
- गद्दारांना आज केवळ शिवसेना नाव हवय, बाळासाहेब ठाकरेंचं नाव हव आहे. पण, शिवसेनेच कुटुंब नकोय.
- एक दिवस असा होता जेव्हा मोदींचे मुखवटे घालून प्रचार केला जायचा. मात्र, आज मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून यावे लागत आहे. आज महाराष्ट्रात मोदी चालत नाही. मोदींच्या नावावर आज महाराष्ट्रात मते मिळत नाहीत. हा महाराष्ट्राचा विजय आहे.
- रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काय झालं? रावण उताणा पडला. आता ज्या चोरांनी शिवधनुष्य चोरलेय. ते देखील उताणे पडल्याशिवाय राहणार नाही.
- शिवसेनेविरोधात केवळ कटकारस्थाने चालू आहेत. उद्या आपले मशाल हे निवडणूक चिन्ह देखील ते गोठवू शकतात.
- लढाई आता सुरू झालीये. ही चोरी आपण त्यांना पचू द्यायची नाहीये. तुम्ही शिवधनुष्य घेऊन या, मी मशाल घेऊन येईल. हिंमत असेल तर निवडणुकीत समोरासमोर या, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच, शिवसैनिकांनो आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश दिले.
- शिवसैनिकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, मी खचलेलो नाही. कारण शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. या गद्दारांच्या छाताडावर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे.
- उद्या फेसबूक लाईव्ह घेऊन मी निवडणूक आयोगासमोर आपण काय-काय मांडले, निवडणूक आयोगाने कसा पक्षपाती निर्णय दिला, याची माहिती देणार आहे.
धनुष्यबाण चोरीला गेले
तत्पूर्वी मातोश्रीसमोर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवसेनेचे धनुष्यबाण चोरीला गेले आहेत. त्या चोराला आम्ही पकडले आहे. त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी तुम्हाला आव्हान देतो की तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुकीत समोर या. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येऊ. मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला आव्हान दिले.
शिवसेना फक्त नाव नाही. शिवसेना फक्त धनुष्यबाण नाही. भले त्यांनी आमचे धनुष्यबाण चोरले असतील. पण आजही लाखो शिवसैनिक माझ्या पाठिशी आहेत. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याने सावध राहण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राला दिल्लीपुढे झुकवणारे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असू शकत नाहीत. अशी तिखट टीकाही उद्धव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. शिवसेनेचे नाव चोरले जाऊ शकते, पण ‘शिवसेना’ चोरता येणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्येष्ठ नेत्यांची बैठक
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी मातोश्रीबाहेर जमून शक्तिप्रदर्शन केले. दादर येथील शिवसेना भवनाजवळही शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन करत आयोगाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी बोलावली आहे.
सर्वोच्च न्यायालयात आव्हान
मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा मोठा जमाव पाहून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासमोर येऊन संवाद साधला. त्यांनी पुन्हा एकदा शिवसैनिकांना निराश न होण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगत त्यांनी शिवसैनिकांना संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
शिवसैनिक समर्थनार्थ रस्त्यावर उतरले
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बोरिवली, दहिसर, कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, अंधेरीसह संपूर्ण मुंबईत शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतरही ते उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरणाऱ्यांना ते धडा शिकवतील.
ठाकरे उत्तर भारतीयांची भेट घेणार
27 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसैनिकांना मातोश्री सभागृहात मार्गदर्शन करणार आहेत. मराठी राजभाषा दिनानिमित्त पक्षातर्फे येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमापूर्वी उद्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. माजी राज्यमंत्री रमेश दुबे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अंधेरी (पूर्व) येथे उत्तर भारतीय समाजाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यापूर्वी त्यांनी गेल्या रविवारी गोरेगावमध्ये उत्तर भारतीय समाजातील लोकांची बैठक घेतली होती.